Maharashtra Election 2019: निवडणुकीचे काम टाळणारे आणखी दोन पोलीस हवालदार निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 09:31 PM2019-10-19T21:31:14+5:302019-10-19T21:32:44+5:30
१६ आॅक्टोबरपासून विनापरवाना गैरहजर
औरंगाबाद: विधानसभा निवडणूकीचे काम टाळण्यासाठी कामावरून गैरहजर राहणाऱ्या दोन पोलीस हवालदारांना पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी शनिवारी तडकाफडकी निलंबित केली. अशीच निलंबनाची कारवाई १५ आॅक्टोबर रोजी तीन पोलिसांवर करण्यात आली होती.
सातारा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल विश्वनाथ जनार्दन पाटे आणि बेगमपुरा ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल निर्मला धनराज ठाकरे अशी निलंबित पोलिसांची नावे आहेत. गुन्हेशाखेचे सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे म्हणाले की, विधानसभा निवडणूक बंदोबस्तासाठी मनुष्यबळ कमी पडू नये, याकरीता राज्यबाहेरील पोलिसांची मदत घेण्यात आली आहे. निवडणूक कालावधीत आजारी रजा वगळता अन्य रजा रद्द करण्यात आल्या आहेत. शिवाय आजपासून तीन दिवस साप्ताहिक सुट्याही रद्द आहेत. याबाबत स्पष्ट आदेश असताना सातारा पोलीस ठाण्यात कार्यरत पोहेकॉ पाटे हे १६ आॅक्टोबरपासून विनापरवाना गैरहजर असल्याचे अहवाल पोलीस आयुक्तांना प्राप्त झाला.
यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर पोहेकॉन निर्मला या२५ सप्टेंबरपासून आजारी रजा टाकून गेल्या आहेत. निवडणूकीचे काम टाळण्यासाठी त्यांनी आजारी रजा टाकल्याचे दिसून येत असल्याने त्यांच्यावर कारवाई झाल्याचे डॉ. कोडे यांनी सांगितले. यापूर्वी १५ आॅक्टोबर रोजी गैरहजर तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले होते. चार दिवसात पाच कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली.