Maharashtra Election 2019: शहरासाठी करणार काय? जाहीर सभांमध्ये स्थानिक मुद्दे गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 04:53 PM2019-10-16T16:53:53+5:302019-10-16T16:56:19+5:30
उमेदवारही आपल्या मतदारसंघातील काही मोजक्याच मुद्यांवर छोटेखानी सभांमध्ये भाष्य करीत आहेत.
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता फक्त सात दिवस उरले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचार सभांवर भर दिला आहे. आतापर्यंत झालेल्या सभांमध्ये ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील मुख्य प्रश्नांना बगल देण्यात आली आहे. राजकीय नेते राष्ट्रीय, राज्यस्तरीय विषयांना स्पर्श करीत आहेत. आमच्या पक्षाचे उमेदवार शहरातील तिन्ही मतदारसंघांतून निवडून आल्यास काय करणार? हे ठोसपणे कोणीही सांगायला तयार नाही. उमेदवारही आपल्या मतदारसंघातील काही मोजक्याच मुद्यांवर छोटेखानी सभांमध्ये भाष्य करीत आहेत.
स्मार्ट सिटीत निवड झालेल्या औरंगाबाद शहराला असंख्य प्रश्न भेडसावत आहेत. यातील अनेक प्रश्न महापालिकेशी निगडित असल्याचे सांगून आमदार, खासदार नागरी समस्यांकडे दुर्लक्ष करीत असतात. दर पाच वर्षांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष प्रचाराचा धुराळा उडवितात. मतदारही आपल्या हक्काचा प्रतिनिधी विधानसभेत पाठवितात. नंतर पाच वर्षे काहीच होत नाही.
२ आॅक्टोबरला एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी आमखास मैदानावर पहिली सभा घेऊन शहरात प्रचाराचा नारळ फोडला होता. ओवेसी यांनी तब्बल ३८ मिनिटे भाषण केले होते. त्यातील २२ मिनिटे ते महात्मा गांधी, नथुराम गोडसे यांच्यावर बोलत होते. औरंगाबाद शहरातील एकाही मुख्य समस्येवर त्यांनी भाष्य केले नाही. शहरातील तीन मतदारसंघांत माझे उमेदवार निवडून आल्यावर काय करतील यावर अवाक्षरही काढण्यात आले नाही. याचपाठोपाठ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सांस्कृतिक मंडळावर सभा झाली. त्यांनीही शहराच्या समस्यांवर विशेष भाष्य केले नाही. महापालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता असताना शहराची दुर्दशा काय हे सर्वश्रुत आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत पाणी प्रश्नावरून शिवसेना उमेदवाराची काय अवस्था झाली, हेसुद्धा औरंगाबादकरांनी पाहिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हर्सूल गावात एक छोटेखानी सभा घेतली. या सभेतही त्यांनी पक्षाच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन केले. भाजपचे राष्ट्रवादी कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी फुलंब्री विधानसभा मतदारसंघासाठी मुकुंदवाडीत दोन दिवसांपूर्वी सभा घेतली. या सभेतही त्यांनी राष्ट्रवादी, राज्यस्तरीय विषयांवरच भाष्य केले.
शहरातील प्रमुख गंभीर समस्या कोणत्या?
1.मागील ३० वर्षांमध्ये एकाही शहर विकास आराखड्यावर काम झाले नाही. अरुंद रस्ते, अतिक्रमणे, वाहतूक कोंडी, पार्किंगचा अभाव.
2. शहरात पर्यटन उद्योगाला वाव मिळावा यादृष्टीने कोणत्याही उपाययोजना नाहीत. पर्यटनस्थळांवर मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव.
3. शिवाजीनगर उड्डाणपुलाचा प्रश्न दहा वर्षांपासून रेंगाळला आहे. हा प्रश्न कायमचा सुटावा यासाठी एकाही राजकीय पक्षाची इच्छाशक्ती नाही.
4. शहरात महिला, पुरुषांसाठी शौचालयांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. संपूर्ण शहराला भेडसावणाऱ्या या समस्यांकडे लक्ष देणार कोण?
5.घाटी रुग्णालय सोडले तर एकही मोठा दवाखाना शहरात नाही. सर्व रुग्णांचा ताण घाटीवर वाढतोय.
6.सिडको-हडकोसह जुन्या शहरात आजही सातव्या दिवशी पाणीपुरवठा होतो.
7.शहरात मागील काही महिन्यांत खून, चोऱ्या, नशेच्या गोळ्यांची विक्री, मंगळसूत्र पळविण्याच्या घटनांमध्ये आमूलाग्र वाढ झाली आहे.