Maharashtra Election 2019 : 'औरंगाबाद मध्य'मधील चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 07:34 PM2019-10-10T19:34:57+5:302019-10-10T19:37:16+5:30

१४ उमेदवार रिंगणात 

Maharashtra Election 2019: Who will be the winner of the Chorangi contest in 'Aurangabad Central'? | Maharashtra Election 2019 : 'औरंगाबाद मध्य'मधील चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?

Maharashtra Election 2019 : 'औरंगाबाद मध्य'मधील चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?

googlenewsNext
ठळक मुद्देतब्बल नऊ उमेदवारांची माघार

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात १४ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. मतदारसंघात शिवसेना, एमआयएम, अशी थेट लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीही निवडणुकीत चांगलाच रंग भरणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

सेना-भाजप युतीचे अधिकृत उमेदवार प्रदीप जैस्वाल यांच्यासाठी किशनचंद तनवाणी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे जैस्वाल यांचा विजय मोकळा झाला, असा दावा युतीकडून करण्यात येत आहे. २०१४ मध्ये औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ एमआयएमने जैस्वाल यांच्याकडूनच हिसकावून घेतला होता. यंदा विजयाचे सातत्य कायम ठेवण्यासाठी पक्षाने जोरदार कंबर कसली आहे. एमआयएमचे बंडखोर जावेद कुरैशी यांनीही तलवार म्यान केली. त्यामुळे विजय हमखास आपलाच, असा दावा एमआयएमकडून होतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कदीर मौलाना यांनीही चांगलेच आव्हान उभे केले आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अमित भुईगळ यांनी आपल्या पारंपरिक मतांवर लक्ष केंद्रित केले आहे. नगरसेविका कीर्ती शिंदे, कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडियाचे अ‍ॅड. अभय टाकसाळ, नगरसेवक चेतन कांबळे, बसपाचे नाना म्हस्के, असे एकूण १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

एमआयएमच्या ताब्यात गेलेला आपला बालेकिल्ला परत ताब्यात घेण्यासाठी शिवसेना सरसावली आहे. सेना उमेदवाराचा थेट मुकाबला एमआयएमशी होणार हे निश्चित असले तरी राष्ट्रवादीचे कदीर मौलाना व वंचित बहुजन आघाडीचे अमित भुईगळ यांची जादू मतदारावर किती चालते यावर विजयाचे गणित आहे. प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांकडे १२ दिवसांचा कालावधी आहे. प्रचारात आघाडी घेण्यासाठी प्रमुख पक्ष जोरदार प्रयत्न करणार आहेत.

मतदारसंघातील प्रमुख प्रश्न
- जुन्या शहरात पाणी प्रश्न अत्यंत गंभीर आहे. बाजारपेठेत पार्किंगची सुविधा कुठेच नाही. मुख्य रस्त्यांना अतिक्रमणांचा विळखा. जिकडेतिकडे खड्डेच खड्डे पाहायला मिळतील. ४० वर्षांपासून रस्ते जशास तसे आहेत. विकास आराखड्यानुसार रुंदीकरण झालेच नाही. अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी.
- मतदारसंघात महिला, पुरुष  शौचालयांचा प्रचंड अभाव असल्याने बाजारपठेत येणाऱ्या नागरिकांसह व्यापाऱ्यांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागतो. रस्त्यावर दुचाकी उभी करताच पोलीस उचलून नेतात.
- मतदारसंघात जगप्रसिद्ध मकबरा, पाणचक्कीचा समावेश असल्याने लाखो पर्यटक शहरात येतात. पर्यटकांना कोणत्याही मूलभूत सोयी-सुविधा नाहीत. घाटी रुग्णालय वगळता आरोग्यसेवा मजबूत नाही. सिमेंटचे जंगल वाढत असताना उद्याने गायब होऊ लागली. नाल्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे.

उमेदवारांच्या जमेच्या बाजू 
प्रदीप जैस्वाल (शिवसेना)
- रात्री-अपरात्री कोणाच्याही मदतीला धावून जाणारा नेता.
- पक्षभेद विसरून विविध जाती-धर्मांच्या नागरिकांशी  सलोखा.
- पदाची पर्वा न करता चाळीस वर्षांपासून राजकारणात सक्रिय.
- सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा नेता अशी ओळख.

नासेर सिद्दीकी (एमआयएम)
- २०१५ मध्ये पहिल्यांदाच एमआयएमच्या तिकिटावर नगरसेवक झाले.
- साडेचार वर्षे महापालिकेत गटनेता म्हणून काम केल्याचा अनुभव पाठीशी.
- विकासकामांचे चांगले व्हिजन.
- संघटन कौशल्यासह वरिष्ठ नेत्यांचा त्यांच्यावर विश्वास.

कदीर मौलाना (राष्ट्रवादी)
- महापालिकेत पाच वर्षे  नगरसेवक म्हणून काम केल्याचा अनुभव पाठीशी.
- २००९ मध्ये विधानसभा निवडणूक लढविल्याचा अनुभव.
- पक्षात राज्य पातळीवर काम केल्याचा दांडगा अनुभव आहे.
- नागरिकांच्या समस्यांची जाणीव.

अमित भुईगळ (वंबआ)
- महापालिकेत पाच वर्षे नगरसेवक म्हणून काम केले.
- प्रकाश आंबेडकर यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळख.
- राजकारणात अनेक वर्षांपासून सक्रिय सहभाग.
- भारिपमध्ये काम केल्याचा दांडगा अनुभव पाठीशी.
- निवडणूक लढण्याची चांगली कसब.

2०14 चे चित्र :
इम्तियाज जलील (एमआयएम-विजयी)  
प्रदीप जैस्वाल          (शिवसेना-पराभूत)

 

Web Title: Maharashtra Election 2019: Who will be the winner of the Chorangi contest in 'Aurangabad Central'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.