केरळवर मात करीत महाराष्ट्र उपांत्यपूर्व फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:30 IST2018-02-19T00:27:21+5:302018-02-19T00:30:03+5:30
नौशाद शेख आणि अंकित बावणे यांच्या शतकी भागीदारीनंतर अष्टपैलू खेळाडू श्रीकांत मुंडेच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर महाराष्ट्राने बिलासपूर येथे आज झालेल्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत केरळ संघावर तब्बल ९८ धावांनी विजय मिळवला. फलंदाजीत चमक दाखवणाºया अंकित बावणे याने क्षेत्ररक्षणातही आपला विशेष ठसा उमटवताना ५ झेल घेत महाराष्ट्राच्या विजयात निर्णायक योगदान दिले. या विजयाबरोबरच महाराष्ट्राने उपांत्यपूर्व फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला.

केरळवर मात करीत महाराष्ट्र उपांत्यपूर्व फेरीत
औरंगाबाद : नौशाद शेख आणि अंकित बावणे यांच्या शतकी भागीदारीनंतर अष्टपैलू खेळाडू श्रीकांत मुंडेच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर महाराष्ट्राने बिलासपूर येथे आज झालेल्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत केरळ संघावर तब्बल ९८ धावांनी विजय मिळवला. फलंदाजीत चमक दाखवणाºया अंकित बावणे याने क्षेत्ररक्षणातही आपला विशेष ठसा उमटवताना ५ झेल घेत महाराष्ट्राच्या विजयात निर्णायक योगदान दिले.
या विजयाबरोबरच महाराष्ट्राने उपांत्यपूर्व फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला.
ब गटात महाराष्ट्र ६ सामन्यांत ४ विजय आणि १८ गुणांसह अव्वल स्थानी राहिला, तर दिल्लीचा संघ १६ गुुणांसह दुसºया क्रमांकावर राहिला. आज झालेल्या सामन्यात केरळ संघाचा कर्णधार सचिन बेबीने नाणेफेक जिंकून महाराष्ट्राला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. त्यानंतर १३.२ षटकांत फार्मात असणारा ऋतुराज गायकवाड (२८), मुर्तुजा ट्रंकवाला (१५), राहुल त्रिपाठी (१५) हे ७६ धावांत परतल्यानंतर अंकित बावणे आणि नौशाद शेख यांनी चौफेर टोलेबाजी करताना महाराष्ट्राच्या धावसंख्येला आकार दिला. या दोघांनी ८३ चेंडूंत १00 धावांची झंझावाती भागीदारी केली. या दोघांनंतर दिव्यांग हिंगणेकर व श्रीकांत मुंडे यांनी २६ चेंडूंत ३९ धावा झोडपताना महाराष्ट्राला ३७ षटकांत ८ बाद २७३ अशी विशाल धावसंख्या गाठून दिली. महाराष्ट्राकडून नौशाद शेखने सर्वाधिक ५६ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ७६ आणि अंकित बावणे याने ४१ चेंडूंत ४ चौकारांसह ४३ धावांची झटपट खेळी केली. दिव्यांग हिंगणेकर याने २१ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३७ धावांची वादळी खेळी केली. ऋतुराज गायकवाडने ४ चौकारांसह २८, निखिल नाईकने १६, मुर्तुजा ट्रंकवाला व राहुल त्रिपाठीने प्रत्येकी १५ व श्रीकांत मुंडेने ११ धावा केल्या. केरळ संघाकडून वॉरियर आणि अभिषेक मोहन यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात केरळचा संघ श्रीकांत मुंढे याच्या धारदार गोलंदाजीसमोर २९.२ षटकांत १७५ धावांत ढेपाळला. पहिल्या स्पेलमध्ये ८ चेंडूंत २ षटकार व एका चौकारांसह १९ धावा काढणाºया अभिषेक मोहनला तंबूत धाडल्यानंतर श्रीकांत मुंढेने दुसºया स्पेलमध्ये प्रारंभी के.बी. कार्तिक व त्यानंतर मोहंमद अझरुद्दीन व फनूस एफ. यांना एकाच षटकांत तंबूत धाडले. अक्षय के.सी. याच्या रूपाने श्रीकांत मुंढेने ५ वा गडी बाद केला. श्रीकांत मुंढेला सत्यजित बच्छावने २, तर अनुपम संकलेचा, निकीत धुमाळ व दिव्यांग हिंगणेकर यांनी प्रत्येकी १ गडी बाद करीत साथ दिली. केरळकडून संजू सॅमसन याने सर्वाधिक ४८ चेंडूंत ४ चौकारांसह ४६ धावा केल्या. कर्णधार सचिन बेबीने २२ व के.बी. अरुण कार्तिक याने २३ धावांचे योगदान दिले.
संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र : ३७ षटकांत ८ बाद २७३.
(नौशाद शेख ७६, अंकित बावणे ४३, दिव्यांग हिंगणेकर ३७, ऋतुराज गायकवाड २८. संदीप वॉरियर २/७४, अभिषेक मोहन २/५४, अभिषेक के. सी. १/५०, एफ. फनूस १/५३). विजयी विरुद्ध
केरळ : २९.२ षटकांत सर्वबाद १७५. (संजू सॅमसन ४६, सचिन बेबी २२, के. बी. अरुण कार्तिक २३. श्रीकांत मुंढे ५/२६, सत्यजित बच्छाव २/४६, अनुपम संकलेचा १/१७, दिव्यांग हिंगणेकर १/३०, निकीत धुमाळ १/५५).