'एनएसडी'च्या धर्तीवर 'महाराष्ट्र स्कुल ऑफ ड्रामाची' होणार स्थापना : अमित देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 06:46 PM2020-02-17T18:46:51+5:302020-02-17T18:49:28+5:30
महाराष्ट्र स्कुल आॅफ ड्रामाची स्थापना करण्यात येत असून यासाठी कलावंतांनी सूचना कराव्यात
लातूर : राज्यात दहा ठिकाणी बाल नाट्य कला केंद्र सुरू आहेत़ आणखीन नवीन ५ केंद्र सुरू करण्यात येत असून त्यातील एक केंद्र लातूर येथे सुरू करण्यात येईल, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी येथे केली़ दरम्यान, नॅशनल स्कुल आॅफ ड्रामाच्या धर्तीवर महाराष्ट्र स्कुल आॅफ ड्रामाची स्थापना करण्यात येत असून यासाठी कलावंतांनी सूचना कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले़
सांस्कृतिक कला संचालनालयाच्या वतीने लातूर येथील दगडोजीराव देशमुख सभागृहात आयोजित १७ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, प्रदीप पाटील खंडापूरकर, ज्येष्ठ रंगकर्मी गिरीष सहदेव, अॅड़ शैलेश गोजमगुंडे, मनोज पाटील, परिक्षक अरूंधती भालेराव, वीणा लोकूर, शंकर घोरपडे, प्रकाश पारखी, एकनाथ आव्हाड, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांची प्रमुख उपस्थिती होती़
यावेळी सांस्कृतिक मंत्री देशमुख म्हणाले, जिल्हा, तालुका स्तरावर कलावंतांना पायाभूत सुविधा निर्माण करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे़ यासाठी नॅशनल स्कुल आॅफ ड्रामाच्या धर्तीवर महाराष्ट्र स्कुल आॅफ ड्रामा सुरू करण्याचा महत्वकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे़ याठिकाणी बालकलाकारांना तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल, तसेच त्यांना नाट्य, चित्रपट निर्मात्यांकडे संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाईल़ स्पर्धेत ३५० नाटके सादर झाली, यातील सहभागी कलाकरांना व्यक्तीगत प्रमाणपत्र देण्यात येईल़ राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धा घेण्याचा उपक्रम तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सुरू केला़ आज लातूरला अंतिम फेरी होत आहे, याचा आंनद होत असल्याचे त्यांनी सांगितले़
प्रारंभी बाल कलाकार स्वंयम शिंदे, सिध्दी देशमुख यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले़ महापौर विक्रांत गोजमगुंडे, गिरीष सहदेव यांनी मनोगत व्यक्त केले़ प्रास्ताविक बिभीषण चवरे यांनी केले़ सूत्रसंचालन हास्य कलाकार बालाजी सूळ यांनी केले़ यावेळी अहमदनगर येथील आराधना ग्रुपच्या वतीने वाणरायण ही नाटीका सादर करण्यात आली़ यातून वाढत्या वृक्षतोडीमुळे वन्यजिवांना होणारा धोका, मानवी वस्तीत वाढलेला वावर यावर प्रकाश टाकला़