राज्यातील पहिले १५० एकरवरील झुऑलॉजिकल पार्क छत्रपती संभाजीनगरात, काम अंतिम टप्प्यात
By मुजीब देवणीकर | Published: July 4, 2024 04:56 PM2024-07-04T16:56:07+5:302024-07-04T16:57:15+5:30
जागेसोबत प्राण्यांची संख्याही वाढणार; प्राण्यांचे ५४ पिंजरे तयार, मत्सालय, सरपटणारे प्राण्यांचीही होणार व्यवस्था
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील पहिले झुऑलॉजिकल पार्क शहरापासून अवघ्या १० कि.मी. अंतरावर मिटमिटा उभारण्यात येत आहे. निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत १५० एकर जागेवर पार्क साकारले जात असून, पर्यटक आणि बच्चेकंपनीसाठी ही पर्वणीच असणार आहे. या प्रकल्पाचे काम स्मार्टसिटीमार्फत सुरू आहे. तब्बल २५० कोटी रुपये यावर खर्च करून केले जात आहेत. आतापर्यंत ६५ टक्यांहून अधिक काम झाले असून, पुढील चार ते पाच महिन्यांत पूर्ण काम होणार असल्याचा दावा स्मार्ट सिटी प्रशासनाने केला.
सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणीसंग्रहालयातील जागा कमी पडू लागली. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने महापालिकेच्या प्राणीसंग्रहालयाची परवानगी रद्द केली होती नंतर प्राणीसंग्रहालय मिटमिटा येथे मोठ्या जागेत स्थलांतरीत करण्यात येत असल्याचे आश्वासन दिल्यावर परवानगी बहाल केली होती. स्मार्ट सिटीच्या माध्यमाने मिटमिट्यात अडीच वर्षांपासून काम सुरू आहे. प्राणी व पक्षांसाठी ५४ पिंजरे तयार करण्यात आले आहेत. पर्यटकांसाठी ॲम्पी थिएटर, फूड प्लाझा, लॉन, व्यापारी संकुल, नैसर्गिक पाण्याचे बंधारे, तलाव, ७ एकरमध्ये पार्किंग, अंतर्गंत सिमेंटचे रस्ते, पथदिवे, स्वतंत्र वीज वितरण यंत्रणा आदी अनेक सुविधांचा समावेश त्यात आहे. प्राण्यांना राहण्यासाठी सुंदर घर, बाहेर फिरण्यासाठी एैसपैस जागा, त्याला संरक्षित जाळी, काही ठिकाणी अत्यंत जाड काच बसविण्यात येणार आहे.
प्राण्यांची संख्याही वाढणार
झुलॉजिकल पार्कच्या कामांची माहिती देताना प्रकल्प समन्वयक इम्रान खान यांनी सांगितले की, सर्व पिंजऱ्यांचे बांधकाम दगडात केले. सिंह, वाघ (पिवळे व पांढरे), बिबट्या, नीलगाय, हरण, काळवीट, सांबर, कोल्हा, लांडगा, लाल माकड, यासह विविध प्रकारचे ३४ प्राणी आणि २० पक्षी वर्गीय प्राण्यांसाठी पिंजरे तयार झाले आहेत. भविष्यात पिंजऱ्यांची संख्या वाढविण्यासाठी जागाही शिल्लक ठेवली आहे.
पर्यटकांची संख्या बरीच वाढणार
महाराष्ट्रात एवढे भव्य झुऑलॉजिकल पार्क कुठेच नाही. देशात यापेक्षाही मोठे पार्क आहेत. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून आणि अन्य राज्यांतील पर्यटकही मोठ्या संख्येने येतील. बाजूलाच १७ हेक्टर जागेवर ओपन सफारीसाठी जागा मिळावी म्हणून प्रयत्न सुरू असल्याचे इम्रान खान यांनी सांगितले.
वृक्षारोपण, पुर्नरोपण
राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाकडून पडेगाव ते दौलताबाद या रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. चौपदरीकरणासाठी या रस्त्यावरील तोडण्यात येणाऱ्या सर्व मोठ्या झाडांचे झुऑलॉजिकल पार्क येथे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यान मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणदेखील करण्यात येणार आहे. यावेळी सहायक प्रकल्प समन्वयक किरण आडे, माध्यम विश्लेषक अर्पिता शरद यांची उपस्थिती होती.