Vidhan Sabha 2019 : ...तर राज्यात सत्ताबदल निश्चित- शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 05:42 AM2019-09-21T05:42:51+5:302019-09-21T05:43:14+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - राज्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्ताबदल नक्की होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.
औरंगाबाद : सीमेवर पुलवामासारखी घटना घडली नाही, तर राज्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्ताबदल नक्की होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. मराठवाड्यात केवळ निरोपावर आयोजित केलेल्या दौºयाला युवकांमधून मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व असाच होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शरद पवार यांनी चार दिवसांपूर्वी सोलापूर येथून सुरू केलेल्या महाराष्ट्रव्यापी दौºयात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. औरंगाबाद येथे मेळावा झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या आधी सीमेवर पुलवामा घडले. त्याचा लाभ राज्यकर्त्यांना झाला. त्यांनी सर्जिकल स्ट्राईक करीत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत असल्याचा संदेश जनतेत पोहोचवला. मी देशाच्या संरक्षण विभागाचा कारभार बघिलेला आहे, त्यामुळे काही सेवानिवृत्त लष्करी अधिकारी ओळखीचे आहेत. या लष्करी अधिकाºयांना ‘पुलवामा’ घडला की घडवला याबद्दल शंका आहे; पण मी हा देशाचा विषय आहे म्हणून त्यावर बोलू नका, असे स्पष्टपणे सांगितले. पुलवामा घडण्यापूर्वी सत्ताधारी जाणार अशीच स्थिती होती. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत पुलवामासारखी घटना घडली नाही, तर सत्ताबदल नक्की होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मराठवाड्यात केलेल्या दौºयात २०० ते ३०० पदाधिकाºयांच्या बैठकीचे नियोजन होते. जाहीर सभा घेण्याची शक्यता नव्हती. मात्र, प्रत्येक जिल्ह्यात हजारांपेक्षा अधिक पदाधिकाºयांनी उपस्थिती लावत अभूतपूर्व असाच प्रतिसाद दिला.
>‘पंतप्रधानांनी प्रगल्भ विचार मांडावेत’
देशाचे पंतप्रधान यांनी नुकताच महाराष्ट्र दौरा केला. त्या दौºयात त्यांनी केलेल्या कामांविषयी बोलणे आवश्यक होते. मात्र, शरद पवारांसारखा
प्रगल्भ नेता असा उल्लेख करून चुकीचे वक्तव्य केले. पंतप्रधानांनी बोलताना प्रगल्भ विचार मांडावेत, असा टोलाही त्यांनी लगावला. मागील दीड वर्षांपासून देशाची अर्थव्यवस्था चुकीच्या दिशेने चालली आहे. केंद्रीय अर्थमंत्री सतत काही तरी घोषणा करताहेत. मात्र, त्याने काही होत नाही. हा विषय आर्थिक आहे. त्याच्याशी खेळ करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.