महाराष्ट्राचा मुंबईवर दणदणीत विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 12:40 AM2019-02-05T00:40:02+5:302019-02-05T00:41:38+5:30
महाराष्ट्राने आपली विजयी घोडदौड कायम राखताना सोमवारी झालेल्या १४ वर्षांखालील पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघावर ८६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. महाराष्ट्राच्या विजयात मराठवाड्याचे खेळाडू सचिन धस याने दोन्ही डावांत अर्धशतक तर सौरभ शिंदे व शिवराज शेळके यांनी सुरेख गोलंदाजी करताना निर्णायक योगदान दिले.
औरंगाबाद : महाराष्ट्राने आपली विजयी घोडदौड कायम राखताना सोमवारी झालेल्या १४ वर्षांखालील पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघावर ८६ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
महाराष्ट्राच्या विजयात मराठवाड्याचे खेळाडू सचिन धस याने दोन्ही डावांत अर्धशतक तर सौरभ शिंदे व शिवराज शेळके यांनी सुरेख गोलंदाजी करताना निर्णायक योगदान दिले.
मुंबईच्या बीकेसी मैदानावर झालेल्या सामन्यात महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात २७६ धावा फटकावल्या. महाराष्ट्राकडून जबरदस्त फार्मात असणाऱ्या व बडोदा संघाविरुद्ध २२८ धावांची खेळी करणाºया बीड येथील सचिन धस याने आपली तीच लय पुढे सुरूठेवताना सर्वाधिक १५७ चेंडूंत १४ चौकारांसह ८४ धावांची खेळी केली. तसेच त्याने अर्सिन कुलकर्णी याच्या साथीने ६९ व सुदर्शन कुंभार याच्या साथीने ५१ धावांची बहुमूल्य भागीदारी केली. सचिनशिवाय अर्सिन कुलकर्णीने ४५, सुदर्शन कुंभारने ४६ व ओमकार राजपूतने २४ धावांचे योगदान दिले. मुंबईकडून झेनिथ सचदेव याने ४१ धावांत ३ गडी बाद केले. त्यानंतर परभणीच्या सौरभ शिंदे याने ३0 धावांत घेतलेल्या ६ बळींच्या जोरावर महाराष्ट्राने मुंबईचा पहिला डाव अवघ्या १६0 धावांत गुंडाळला. मुंबईकडून प्रेम नाईक याने सर्वाधिक ५६ धावा केल्या. सौरभ शिंदे याला शिवराज शेळके व सुदर्शन कुंभार यांनी प्रत्येकी १ गडी बाद करीत साथ दिली. पहिल्या डावात ११६ धावांची आघाडी घेणाºया महाराष्ट्राने दुसºया डावात सर्वबाद १२१ धावा केल्या. महाराष्ट्राकडून पहिल्या डावात अर्धशतक ठोकणाºया सचिन धस याने दुसºया डावातही आपला विशेष ठसा उमटवताना ४९ चेंडूंतच १0 चौकारांसह ५२ धावांची सुरेख खेळी केली. तसेच पहिले तीन फलंदाज १९ धावांत तंबूत परतल्यानंतर सचिन धस याने किरण चोरमाले याच्या साथीने चौथ्या गड्यासाठी महत्त्वपूर्ण अशी ६३ धावांची भागीदारी केली. सचिन धस याला साथ देणाºया किरण चोरमाले याने ४ चौकारांसह २४ व सुदर्शन कुंभारने १५ धावा केल्या. मुंबईकडून अनुराग सिंग याने ३८ धावांत ६ बळी घेतले. त्याला वरद वझे याने १४ धावांत २ तर रोनीत ठाकूर व झेनिथ सचदेवा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
त्यानंतर विजयासाठी २३८ धावांचे लक्ष्य घेऊन खेळणारा मुंबईचा संघ बीडच्या डावखुरा फिरकी गोलंदाज शिवराज शेळके याच्या जादुई फिरकी गोलंदाजीसमोर अवघ्या १५१ धावांत गारद झाला. मुंबईकडून उत्सव कोटी याने सर्वाधिक ५७ चेंडूंत सर्वाधिक ४५ व तर राजसिंग देशमुख याने ३ चौकार व एका षटकारासह ४२ धावा केल्या. शिवराज शेळके याने ४२ धावांत ५ गडी बाद केले. त्याला सचिन धस याने 0 धावांत २ तर निलय शिवंगी व किरण चोरमाले यांनी प्रत्येकी १ गडी बाद करीत साथ दिली.
पश्चिम विभागीय स्पर्धेत विजेतेपदाकडे वाटचाल करणाºया या महाराष्ट्राच्या संघाला १४ वर्षांखालील एमसीएचे निवड समिती सदस्य व व्यवस्थापक राजू काणे आणि प्रशिक्षक अजय चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.
सं. धावफलक
महाराष्ट्र (पहिला डाव) : ११८.३ षटकांत सर्वबाद २७६. (सचिन धस ८४, सुदर्शन कुंभार ४६, अर्सीन कुलकर्णी ४५, झेनिथ सचदेव ३/४१, अनुराग सिंग २/४८).
दुसरा डाव : ४१.२ षटकांत सर्वबाद १२१. (सचिन धस ५२, किरण चोरमाले २४, सुदर्शन कुंभार १५. अनुराग सिंग ६/३८, वरद वझे २/१४).
मुंबई : पहिला डाव : ८१.२ षटकांत सर्वबाद १६0. (प्रेम नाईक ५६, रोनित ठाकूर ३१. सौरभ शिंदे ६/३0).
दुसरा डाव : ४0 षटकांत सर्वबाद १५१. (उत्सव कोटी ४५, राजसिंग देशमुख ४२. शिवराज शेळके ५/४२, सचिन धस २/0, नीलय शिवंगी १/३५, किरण चोरमाले १/२१).