वर्गभेद, जातिभेद नष्ट करण्यात महाराष्ट्राचे कार्य कौतुकास्पद : मोरारी बापू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 11:32 AM2024-09-11T11:32:53+5:302024-09-11T11:53:31+5:30
वेरूळ येथील संत जनार्दन स्वामी महाराज यांच्या आश्रमात ७ ते १५ सप्टेंबरदरम्यान राष्ट्रसंत परमपूज्य मोरारी बापू यांची श्रीराम कथा सुरू आहे
खुलताबाद : महाराष्ट्राने वर्गभेद, जातिभेद नष्ट करण्यासाठी कौतुकास्पद काम केले असून त्यासाठी थोर समाजसेवक व संतांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसंत परमपूज्य मोरारी बापू यांनी मंगळवारी चौथ्या दिवसाच्या रामकथेत बोलताना केले.
वेरूळ येथील संत जनार्दन स्वामी महाराज यांच्या आश्रमात ७ ते १५ सप्टेंबरदरम्यान राष्ट्रसंत परमपूज्य मोरारी बापू यांची श्रीराम कथा सुरू असून ही कथा श्रवण करण्यासाठी देश-विदेशातील हजारो भाविक वेरूळमध्ये दाखल झाले आहेत. या रामकथेमुळे वेरूळनगरीस यात्रेचे स्वरूप आले आहे. चौथ्या दिवशीच्या रामकथेत मोरारी बापू म्हणाले, महाराष्ट्रातील अनेक संत-महंतांनी जातिभेदाला नष्ट करण्यासाठी कौतुकास्पद कार्य केले आहे. ज्ञानींना भाषा नसते. बुद्धीच्या गुहेत चैतन्य महाप्रभू आणि राय रामानंद यांच्यातील अप्रतिम संवाद तुलसीजींनी चार शब्दांनी सूचित केला आहे. तिथे बसलेली स्वतः प्रभा, परिपक्व प्रज्ञा, हनुमानजी सोबती आहेत, सुग्रीव नायक आहेत आणि जामवंत मार्गदर्शक आहेत. सीतेच्या शोधात शरीराची आसक्ती सरिता, बाण, गिरी आणि खोह ही चार भक्ती केंद्रे सोडून गेली. सीता म्हणजे शांती, भक्ती आणि शक्ती. भक्तीच्या शोधात निघालेली वानरं देहाची ममता सोडून नदीकाठी भक्ती साधतात. वाहणाऱ्या गंगा नदीच्या काठी भागवतांची भक्ती विकसित झाली. भक्ती प्रवाही आणि गतिमान असावी, बंधन नसावी, असेही ते म्हणाले.
यवतमाळ येथील रामकथेचे निमंत्रण
‘लोकमत’ वृत्तपत्र समुहाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांनी मंगळवारी वेरूळ येथे राष्ट्रसंत परमपूज्य मोरारी बापू यांची भेट घेऊन विविध विषयांवर संवाद साधला. तसेच यवतमाळ येथील रामकथेसाठी मोरारी बापू यांना निमंत्रण दिले.