‘आम’खासवर उसळला जनसागर

By Admin | Published: October 5, 2016 01:09 AM2016-10-05T01:09:43+5:302016-10-05T01:18:22+5:30

औरंगाबाद : मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने मंगळवारी आमखास मैदानावर जनसागर उसळला होता. विविध पक्ष संघटनांच्या १२ पेक्षा अधिक मोर्चेकऱ्यांना

'Mahasamhaasakalasalaya Janasagar' | ‘आम’खासवर उसळला जनसागर

‘आम’खासवर उसळला जनसागर

googlenewsNext


औरंगाबाद : मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने मंगळवारी आमखास मैदानावर जनसागर उसळला होता. विविध पक्ष संघटनांच्या १२ पेक्षा अधिक मोर्चेकऱ्यांना थांबण्याची व्यवस्था आमखासवर करण्यात आली होती. मैदानात जिकडे तिकडे चिखलच चिखल पसरलेला होता. चिखल तुडवतच आंदोलकांना मार्ग काढावा लागत होता. तासन्तास उन्हाचे चटके सहन करणाऱ्या आंदोलकांसाठी प्रशासनाने साध्या पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था केली नव्हती हे विशेष. सकाळी ११ वाजता रिमझिम पावसाला सुरुवात झाली. पावसातही विविध संघटनांचे मोर्चे गगनभेदी घोषणा देत आमखासकडे वाटचाल करीत होते. मिलकॉर्नर, पैठणगेट, शहागंज, क्रांतीचौक येथून निघालेले मोर्चे एकानंतर एक आमखासवर येऊन धडकत होते. पोलीस यंत्रणा आंदोलनकर्र्त्यांना मैदानावर पाठवून मोकळा श्वास घेत होते. विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलकांनी सिटी क्लबसमोरच ठिय्या मांडला. त्यामुळे इतर मोर्चेकऱ्यांना ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. मैदानात महापालिकेच्या वतीने मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, पिण्याचे पाणी कुठेच नव्हते.
‘रा ज्यातील ९२ हजार वीज कामगारांना निवृत्त वेतन योजना लागू करा’ या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र वीज तांत्रिक कामगार संघटनेने काढलेल्या मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधले. शिष्टमंडळाने मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिवाळीपूर्वी वीज कामगारांना १६.६६ टक्के म्हणजे दोन महिन्यांचे वेतन देण्यात यावे. लाईनस्टाफला ८ तासांपेक्षा जास्त काम केल्यास त्या अतिरिक्त कामाचा मोबदला देण्यात यावा, तांत्रिक कामगारांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना त्वरित लागू करण्यात यावी इ. मागण्यांचा समावेश होता. मोर्चात संघटनेचे सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन, रावसाहेब मोरे, आर.पी.थोरात, अशोक पाथरकर, प्रकाश निकम, मनोज मोरे, ताराचंद कोल्हे, भाऊसाहेब भाकरे, एस.बी.कोळनूरकर, स्मिता अंधारे यांच्यासह पारेषण व वितरण झोनचे पदाधिकारी, वीज कामगार सहभागी झाले होते.
ए कात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत कार्यरत असलेल्या पर्यवेक्षिकांना बालविकास प्रकल्प अधिकारी पदावर शंभर टक्के पदोन्नती मिळणे यासह विविध मागण्यांसाठी मंगळवारी महाराष्ट्र राज्य पर्यवेक्षिका संयुक्त कृती समितीतर्फे मोर्चा काढण्यात आला. एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत कार्यरत असलेल्या पर्यवेक्षिकांना बालविकास प्रकल्प अधिकारी पदावर पदोन्नती मिळणे, केंद्र शासनाच्या नियमानुसार योजनेची अंमलबजावणी करणे, ग्रेड पे मध्ये वाढ करणे इ. मागण्यांसाठी मिल कॉर्नर येथून मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा आमखास मैदानात दाखल झाला. यावेळी समितीच्या सुरेखा जगदाळे, मंगल भवर, छाया सोनकांबळे, इंदुमती राठोड, वंदना नानोटे, कल्पना पांडे आदी पर्यवेक्षिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
स हा ज्वलंत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शहर काँग्रेस व जिल्हा (ग्रामीण) काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रिमंडळ बैठकीवर विराट मोर्चा काढण्यात आला होता. जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
शहागंज येथील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. सिटीचौक, बुढीलेन मार्गे मोर्चा आमखास मैदानाच्या दिशेने निघाला. यावेळी शहराध्यक्ष नामदेव पवार, आ. सुभाष झांबड, डॉ. कल्याण काळे, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, विलासबापू औताडे, पवन डोंगरे, काँग्रेसचे सर्व नगरसेवक मोर्चात सहभागी झाले होते. सिडको-हडको ब्लॉक काँग्रेसतर्फे रस्त्यात दिसेल तो कचरा उचलण्याचे काम करण्यात येत होते. बबन डिडोरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छतेचे काम करण्यात आले. आमखास येथे आल्यानंतर जामा मशिदीजवळील कायम विनाअनुदान कृती समितीच्या शिक्षकांचे आंदोलन सुरू होते. यावेळी रस्त्यावर शिक्षक ठाण मांडून बसले होते. रस्त्याच्या बाजूने काँग्रेसला वाट काढावी लागली.

म हाराष्ट्र कायमस्वरूपी विनाअनुदानित बी.एड. महाविद्यालय प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी मंगळवारी शहरात आयोजित मंत्रिमंडळ बैठकीवर मोर्चा नेण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व डॉ. धनंजय वडमारे, डॉ. सतीश सातव, डॉ. दादाराव चव्हाण, प्रा. बाबासाहेब बडे, डॉ. भूषण पाटील, डॉ. राजेश खिल्लारे, दिलीप कोंडके, डॉ. किशोर मोरे, डॉ. सुजाता आडमुठे आदींनी केले. आमखास मैदानाजवळ हा मोर्चा अडविण्यात आला. त्यानंतर सुभेदारी विश्रामगृह येथे शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन सादर केले. सीईटी न झालेल्या विद्यार्थ्यांना इच्छेनुसार विनाअट बी.एड. व एम.एड. अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यात यावा, या मुख्य मागणीसाठीच आज या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
अ नुदानास पात्र घोषित व अघोषित सर्व शाळांना प्रचलित नियमानुसार टप्पा अनुदान द्यावे, या प्रमुख मागणीसाठी क्रांतीचौक येथून महाराष्ट्र राज्य विना अनुदान कृती समितीचा ‘अनुदान हक्क’ मोर्चा निघाला. मोर्चात सहभागी हजारो शिक्षकांनी शासनाच्या जुलमी धोरणाविरुद्ध घोषणा दिल्या. पांढरा शर्ट व खाकी हाफ.... पॅन्ट परिधान केलेले शिक्षक हे या मोर्चाचे खास आकर्षण ठरले.
या मोर्चाचे नेतृत्व हे आतापर्यंत अनुदानासाठी झालेल्या आंदोलनात शहीद शिक्षकांच्या कुटुंबियांनी केले. क्रांतीचौकपासून सुरू झालेला हा मोर्चा पुढे नूतन कॉलनी, पैठणगेट, टिळकपथ, गुलमंडी, सराफा, सिटीचौक, किलेअर्क मार्गे आमखास मैदानाकडे वळवण्यात आला. आमखास मैदानाजवळ आल्यानंतर पोलिसांनी मोर्चा अडविला. तेव्हा तेथेच मोर्चेकरी शिक्षकांनी ठाण मांडून घोषणाबाजी सुरू केली.
मोर्चात काँग्रेस शिक्षक सेलचे प्रदेश अध्यक्ष मनोज पाटील, शिक्षण संस्था महामंडळाचे एस.पी. जवळकर, वाल्मीक सुरासे, मुख्याध्यापक संघटनेचे मनोहर सुरगडे, शिवाजी चव्हाण, संध्या काळकर, शिक्षक सेनेचे नामदेव सोनवणे, ललित कला संघटनेचे प्रल्हाद शिंदे, कृती समितीचे अध्यक्ष तात्यासाहेब म्हसकर, उपाध्यक्ष खंडेराय जगदाळे, अरुण मराठे,
प्रशांत रेड्डीज, यादव शेळके, प्रबळ शिक्षकेतर कर्मचारी संघाचे सुनील पांडे, शेख पाशूभाई, हैदरखान पठाण, कैलास गौतम,
प्रकाश वाघमारे, राजेश देशमुख आदींसह हजारो शिक्षक व शिक्षिका सहभागी झाल्या
होत्या.
य शवंत सेना आणि धनगर समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारी भडकलगेट येथून मोर्चा काढण्यात आला. यामध्ये ‘यळकोट यळकोट, जय मल्हार’ चा जयघोष आणि भंडाऱ्याची उधळण करीत सहभागी झालेल्या हजारो धनगर समाजबांधवांमुळे आमखास मैदानात जणू प्रतिजेजुरी अवतरली. यावेळी पिपाण्या वाजवून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. पिपाण्या वाजवीत काढण्यात आलेल्या या अनोख्या मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष भारत सोन्नर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. सत्ता आल्यानंतर पहिल्या कॅबिनेट बैठकीत धनगर समाजास आरक्षण देण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली होती; परंतु अनेक बैठका झाल्या, तरीही आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही. मंत्रिमंडळ बैठकीनिमित्त मंगळवारी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि आरक्षणाच्या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने भडकलगेट येथून मोर्चा काढण्यात आला. पारंपरिक वेशभूषा साकारून मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले. हातात पिवळ्या पताका आणि भंडाऱ्याची उधळण यामुळे संपूर्ण मोर्चा लक्षवेधी ठरला. विविध घोषणा आणि ‘यळकोट यळकोट, जय मल्हार’चा जयघोष करीत मोर्चा आमखास मैदानात दाखल झाला. या ठिकाणी प्रतिजेजुरी अवतरल्याचा भास होत होता.
यावेळी रणजित खांडेकर, शिवाजी प्रभाळे, अशोक भावले, लक्ष्मण लकडे, उमेश निर्मळ, भाऊसाहेब खांडेकर, गणेश सातपुते, बाबू उगडे, सुदाम सोलकर, राम काळे, बाळू घाडगे, बाळू खोमणे, अर्जुन कोळेकर, नागेश शेकटा, सुनील फाटक, शिवाजी ठेकळे, विशाल पांढरे, बळीराम खटके, तुकाराम वायाळ, आनंद पवार, दीपक महान्वर, डॉ. संदीप घुगरे, वेदांत वैद्य आदींचा सहभाग होता.
क निष्ठ महाविद्यालयांना शंभर टक्के अनुदान द्या किंवा तेथे कार्यरत शिक्षकांना इच्छा मरणाची परवानगी द्या, या मागणीसाठी महाराष्ट्र ज्युनिअर कॉलेज अनुदान हक्क कृती समितीने काढलेला मोर्चा सर्वांचे आकर्षण ठरला.
अनुदानाच्या प्रतीक्षेत मरणयातना भोगणाऱ्या शिक्षकांच्या व्यथा मांडणारा जिवंत देखावा शहरवासीयांचे आकर्षण ठरले. या मोर्चाच्या अग्रभागी स्वर्गरथ होता. त्यामध्ये मयत शिक्षकाचे पार्थिव आणि बाजूला आक्रोश करणारे कुटुंबिय, हा जिवंत देखावा खूप काही सांगून गेला. स्वर्गरथामागे शिक्षक, शिक्षिका गगनभेदी घोषणा देत होते. सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयांना (कनिष्ठ महाविद्यालय) पात्र- अपात्र, घोषित- अघोषित अशा शब्दांचा खेळ न करता सर्व विनाअनुदानित शाळांना शंभर टक्के अनुदान देण्यात यावे, १९ सप्टेंबर २०१६ रोजीचा अनुदानासंबंधीचा अन्याय करणारा अध्यादेश रद्द करावा आदी मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने मंत्रिमंडळ बैठकीनिमित्त शिक्षणमंत्र्यांना सादर केले. मोर्चात सुनील वाकेकर, राकेश खैरनार, राजेंद्र नेवगे, जाहेर पटेल, भाऊराव खिचडे, योगेश नंदन, आशा दांडगे, नितीन नागरगोजे, निर्मला वहाटुळे, तुळशीराम पाटील, किरण पाटील आदी सहभागी झाले होते.

Web Title: 'Mahasamhaasakalasalaya Janasagar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.