छत्रपती संभाजीनगरात १३ जुलै रोजी मनोज जरांगे यांची महासंवाद रॅलीचे आयोजन
By बापू सोळुंके | Published: June 21, 2024 08:21 PM2024-06-21T20:21:47+5:302024-06-21T20:23:10+5:30
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या लढ्याला मराठा समाजाने पूर्ण ताकदीनिशी उभे राहण्याचा निर्णय या बैठकीत एकमताने घेण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाला सगे-सोयऱ्याचे आरक्षण देणारा कायदा करावा आणि मराठा आंदोलकांवरील गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकाला १३ जुलैपर्यंत मुदत दिलेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने १३ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगरात जरांगे यांची महासंवाद रॅलीचे आयोजन करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला.
सकल मराठा समाजाची जिल्हास्तरीय बैठक शुक्रवारी दुपारी हर्सूल येथील एका मंगलकार्यालयात झाली. या बैठकीला जिल्ह्यातील विविध तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या लढ्याला मराठा समाजाने पूर्ण ताकदीनिशी उभे राहण्याचा निर्णय या बैठकीत एकमताने घेण्यात आला. १३ जुलै रोजी राजमाता जिजाऊं चौक(केम्ब्रीज चौक)ते क्रांतीचौक अशी महासंवाद रॅलीचे आयोजन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
जिल्ह्यातील सर्व मराठा समाजाने महारॅलीत सहभागी व्हावे, यासाठी जास्तीत जास्त गावांत जनजागरण करण्याची जबाबदारी तालुका आणि विविध सर्कलमधील स्वयंसेवक आणि पदाधिकाऱ्यांवर यावेळी सोपविण्यात आली. महारॅलीकरीता येणाऱ्या नागरीकांची पिण्याच्या पाण्याची सुविधा केली जाईल. तसेच वाहनतळाची माहिती लवकरच दिली जाणार असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले.
या बैठकीसाठी प्रा.चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, अप्पासाहेब कुढेकर, सतिश वेताळ, सुनील कोटकर, सचीन हावळे, मनोज गायके, प्रभाकर मते, पंढरीनाथ गोडसे, गणपत म्हस्के, भारत कदम, राजीव थिटे, अजय गंडे,रवींद्र नीळ, गणेश मोटे , अजय पाटील राजू मोहिते , डॉ. मनीषा मराठे, रेखा वाहटुळे, कल्पना साखळे, शारदा शिंदे, दिपाली पाटील यांच्यासह शेकडो समाजबांधवांची उपस्थिती होती.