'माझ्या रक्तात फुले-आंबेडकर, भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करण्यास तयार'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 01:10 PM2022-12-10T13:10:45+5:302022-12-10T13:11:13+5:30
मंत्री चंद्रकात पाटील यांचा वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
औरंगाबाद: महापुरुषांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्यावरून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात राज्यभर जोरदार निदर्शने होत आहेत. यावर मंत्री पाटील यांनी आज पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. जर 'भिक' या शब्दामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे, असे मोठे वक्तव्य मंत्री पाटील यांनी आज केले.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी पैठण येथे संतपिठाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी सरकारी मदतीचा संदर्भ देत असताना महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केले. कर्मवीर भाऊराव पाटील- महात्मा फुले - बाबासाहेब आंबेडकर यांनी भिक मागून शाळा चालवल्या या वक्तव्यावर आक्षेप घेत राज्यभर यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आंदोलने, निदर्शने सुरु झाली. दरम्यान, आज सकाळी मंत्री पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करण्याची तयारी दर्शवत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
ते म्हणाले, माझ्या रक्तात आंबेडकर-फुले आहेत. मी त्यांच्याबद्दल काहीही चुकीचा बोललो नाही. माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदरच आहे. माझी त्यांच्यावर श्रद्धा आहे. तरी देखील 'भिक' या शब्दावरून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे, अशी भूमिका मंत्री पाटील यांनी घेतली आहे. या भुमिकेनंतर आता मंत्री पाटील यांच्या विरोधातील निदर्शने शांत होतील का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी तक्रार दाखल
महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा चालवल्या, असे वादग्रस्त विधान करून महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात शहरातील वेदांत नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच, शहरात चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात शहर काँग्रेस, रिपब्लिकन सेनेने आक्रमक प्रतिक्रिया दिली.