महावंदनेस लोटला जनसागर
By Admin | Published: April 15, 2016 01:41 AM2016-04-15T01:41:22+5:302016-04-15T01:46:34+5:30
परभणी : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून परभणीत महावंदनेचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
परभणी : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून परभणीत महावंदनेचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. जिल्हाभरातील विविध जयंती समित्यांच्या एकत्रित प्रयत्नातून सुमारे ५० हजार अनुयायांच्या उपस्थितीत महावंदना घेण्यात आली. या महावंदनेनंतर महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर गुरुवारी सकाळी ८ वाजता हा कार्यक्रम पार पडला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्यानिमित्ताने परभणीत महिनाभरापासून या कार्यक्रमाची तयारी सुरु होती. विविध जयंती मंडळांकडून जयंती कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. यावर्षी प्रथमच परभणीत सुकाणू समितीची स्थापना करुन सामूहिक महावंदना घेण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
१४ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेपासूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात शुभ्रवस्त्र परिधान करुन अनुयायांची गर्दी होत होती. सकाळी ८ ही महावंदनेची वेळ देण्यात आली होती. निश्चित केलेल्या वेळेनुसार महावंदनेला सुरुवात झाली. प्रारंभी भदंत उपगुप्त महास्थवीर, भदंत उपगुप्त महाथेरो, भदंत कश्यप, भदंत मुदितानंद यांच्या हस्ते धम्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. महास्थवीर यांनी उपस्थितांना बुद्ध, धम्म, संघ सामूहिक वंदना दिली. महावंदनेनंतर त्रिसरण, पंचशील आणि भीमगाथा पार पडली. महावंदनेच्या समारोपीय भागात सामूहिक संकल्प घेण्यात आला. त्यात धम्माने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याची शपथ उपस्थितांनी घेतली.
परभणीत महावंदनेच्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आंबेडकरी अनुयायांसह विविध क्षेत्रातील मान्यवर महावंदनेसाठी उपस्थित होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील दोन्ही रस्त्यांच्या बाजुने मिळेल त्या ठिकाणी बसून, उभे टाकून नागरिक या उपक्रमात सहभागी झाले होते. या उपक्रमात महिला व पुरुष शुभ्रवस्त्र परिधान करुन सहभागी झाले होते. मंगलमय वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी खा. बंडू जाधव, आ.राहुल पाटील, उपमहापौर भगवान वाघमारे, आनंद भरोसे, विजय वाकोडे, सिद्धार्थ हत्तीअंबिरे, डॉ. प्रकाश डाके, भीमराव हत्तीअंबिरे, बी.एच.सहजराव, भीमराव खाडे, डॉ.भगवान धूतमल, अरुणकुमार लेमाडे, डॉ.सुरेश शेळके, डॉ. परमेश्वर साळवे, राजकुमार मनवर, भीमराव शिंगाडे, रवि सोनकांबळे, डॉ. अशोक जोंधळे, अॅड.रवि गायकवाड, डी.एन. दाभाडे, प्राचार्य सुरेश सदावर्ते, सुधीर साळवे, विजय गायकवाड, संजय सारणीकर, सिद्धार्थ भराडे, गौतम मुंडे, नगरसेवक सचिन देशमुख, टी.टी.कांबळे, द्वारकाबाई गंडले, राणूबाई वायवळ, शांताबाई जोगदंड, मनिषा ढवळे, शीलाताई कागदे, कमलताई उबाळे, आशाताई मालसमिंदर, रणजीत मकरंद, प्रा.सुनील तुरुकमाने, पंकज खेडकर, मिलिंद बामणीकर, नागेश सोनपसारे, भीमराव वायवळ, सुशील कांबळे, कैलास गायकवाड, आकाश लहाने, अतुल सरोदे, यशवंत मकरंद, डॉ. सुनील अहिरराव, भीमप्रकाश गायकवाड, किरण मानवतकर, रवि पंडित आदींची उपस्थिती होती.