लवकरच महाविकास आघाडी 'संभाजीनगर'वर शिक्कामोर्तब करणार : सुभाष देसाई
By सुमेध उघडे | Published: January 16, 2021 12:27 PM2021-01-16T12:27:36+5:302021-01-16T12:30:23+5:30
Aurangabad Rename शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पंचवीस वर्षांपूर्वी औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर असे करून टाकले आहे.
औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पंचवीस वर्षांपूर्वी औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर असे करून टाकले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच औरंगजेब सेक्युलर होता का? असा प्रश्न उपस्थित केला. लवकरच महाविकास आघाडी सरकार शहराच्या नामकरणावर शिक्कामोर्तब करेल असा विश्वास पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज औरंगाबादेत व्यक्त केला.
शहराच्या नामकरणावरून मागील काही दिवसांपासून वाद सुरु आहे. औरंगाबाद की संभाजीनगर यावरून भाजप शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. याशिवाय महाविकास आघाडीतील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांना सुद्धा विरोधकांनी या मुद्यावरून कोंडीत पकडले आहे. कॉंग्रेसने संभाजीनगर नावावरून जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर शिवसेनेने संयमी भूमिका घेतली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रसने याचा निर्णय महाविकास आघाडी मिळून घेईल. तीनही पक्षांचे जेष्ठ नेते यावर जे निर्णय घेतील तो सर्व मान्य असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा अधिक पेटणार असे दिसत आहे.
औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यावरुन महाविकास आघाडीत बेबनाव आहे असे आरोप विरोधक करत आहेत. मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी यावर प्रतिक्रिया देत महाविकास आघाडी यावर सकारात्मक असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे. लवकरच शहर नामकरणासाठी महाविकास आघाडी संभाजीनगरचा प्रस्ताव आणेल असे त्यांनी म्हटले आहे. प्रस्ताव आणून महाविकास आघाडी सरकार शहराच्या नामकरणावर शिक्कामोर्तब करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. शनिवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते शहरातील विविध विकास कामांचे लोकार्पण होत आहे यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.