महावीर चौक ते स्टेशनकडे जाणारा रस्ता बंद; रामकथेसाठी तीन दिवस वाहतूक मार्गात बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 14:10 IST2023-11-06T14:07:40+5:302023-11-06T14:10:32+5:30
कथा ऐकण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे.

महावीर चौक ते स्टेशनकडे जाणारा रस्ता बंद; रामकथेसाठी तीन दिवस वाहतूक मार्गात बदल
छत्रपती संभाजीनगर : अयोध्यानगरी मैदानावर धीरेंद्र शास्त्री (बागेश्वर धाम) यांची रामकथा ६ ते ८ नोव्हेंबरदरम्यान होत आहे. या काळात सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत वाहतुकीमध्ये शहर पोलिसांनी बदल केले आहेत.
कथा ऐकण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. महिला, लहान मुले, पुरुष व वयोवृद्ध सहभागी होणार असल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वर्दळ होऊन गैरसोय होऊ नये म्हणून हा बदल करण्यात आल्याचे शहर वाहतूक पोलिसांनी कळविले आहे.
वाहतुकीस बंद असलेले मार्ग
मध्यवर्ती बसस्थानकाकडून महावीर चौक उड्डाणपुलावरून रेल्वे स्थानकाकडे जाणारा व येणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद असेल. त्याशिवाय पंचवटी ते रेल्वे स्टेशन उड्डाणपुलाखालील रस्ता, रेल्वे स्टेशन ते पंचवटी चौकाकडे उड्डाणपुलाखालून येणारा रस्ता, कोकणवाडी ते रेल्वे स्टेशन जाणाऱ्या रोडवरील बन्सीलालनगर कमानीपासून ते अयोध्यानगरीपर्यंत जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद असणार आहे.
बंद असलेल्या मार्गासाठी पर्यायी रस्ता
कार्तिकी हॉटेल चौकाकडून महावीर चौकाच्या उड्डाणपुलावरून रेल्वे स्टेशनकडे जाणारी वाहने बाबा पेट्रोल पंप, जिल्हा न्यायालय, कोकणवाडीमार्गे किंवा क्रांती चौकमार्गे रेल्वे स्टेशनकडे जातील. रेल्वे स्टेशनकडून मध्यवर्ती बसस्थानकाकडे येणारी वाहने ही रेल्वे स्टेशन, कोकणवाडी, जिल्हा न्यायालय, सावरकर चौक, कार्तिकी हॉटेल चौकमार्गे येतील. लोखंडी पुलाकडून रेल्वे स्टेशनकडे जाणारी वाहने ही लोखंडी पूल, पंचवटी चौक, कोकणवाडी चौकमार्गे रेल्वे स्टेशनला जातील.
तगडा बंदोबस्त
धीरेंद्र शास्त्री यांच्या रामकथेला सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामध्ये एक सहायक पोलिस आयुक्त, ९ पोलिस निरीक्षक, १७ सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक, १५८ पोलिस कर्मचारी आणि १५९ होमगार्ड सुरक्षेसाठी तैनात केले आहेत.