विद्यापीठात आकार घेतेय महावीर गॅलरी; जैन धर्मावर व्यापक संशोधनाची सुविधा मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 04:50 PM2022-04-14T16:50:04+5:302022-04-14T16:53:51+5:30
Mahavir Jayanti: विद्यापीठाच्या इतिहास विभागात ही गॅलरी उभारली जाणार असून त्यावर ७६ लाख रुपये खर्च करण्याचा निर्धार भारतवर्षीय दिगंबर जैन महासभेने (लखनौ व दिल्ली) केला आहे.
- विजय सरवदे
औरंगाबाद : जैन धर्मावर व्यापक संशोधन व्हावे, विद्यार्थ्यांना संदर्भग्रंथ उपलब्ध व्हावेत, नव्या पिढीला भगवान महावीरांच्या पुरातन मूर्तीं, हस्तलिखितांचे अवलोकन करून त्यांचे विचार आत्मसात करता येतील, या उदात्त हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात (Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University) लवकरच महावीर गॅलरी उभारली जाणार असून यासंदर्भात विद्यापीठ आणि भारतवर्षीय दिगंबर जैन महासभा यांच्यात नुकताच करार झाला आहे.
विद्यापीठाच्या इतिहास विभागात ही गॅलरी उभारली जाणार असून त्यावर ७६ लाख रुपये खर्च करण्याचा निर्धार भारतवर्षीय दिगंबर जैन महासभेने (लखनौ व दिल्ली) केला आहे. यासंदर्भात महासभेच्या महाराष्ट्र शाखेचे उपाध्यक्ष वसंत वायकोस गुरुजी यांनी सांगितले की, महावीर गॅलरी उभारण्याचा संपूर्ण खर्च भारतवर्षीय दिगंबर जैन महासभा करणार आहे. इतिहास विभागात यासाठी जागा निश्चित झाली आहे. ३० ऑक्टोबर २०२१ रोजी यासंदर्भात करार झाला आहे. लवकरच गॅलरीचे भूमिपूजन होईल. करारानुसार १५ महिन्यांत गॅलरीची इमारत उभी राहील.
महावीर गॅलरीची कल्पना
वसंत वायकोस गुरुजी यांनी १९७२ मध्ये विद्यापीठात अधीक्षक पदावर नोकरी करत होते. तेव्हा आर.पी. नाथ हे कुलगुरू आणि आर.एस. गुप्ते हे इतिहास विभागप्रमुख होते. वायकोस गुरुजी यांना जैन धर्मातील पुरातन हस्तलिखिते, मूर्ती अशा दुर्मीळ वस्तू संकलीत करण्याचा छंद होता. त्यामुळे त्यांनी स्वतंत्र वाहन, चालक देऊन या कामासाठी रजाही मंजूर केली होती. वायकोस गुरुजी यांनी खेडोपाडी, गावागावांत जाऊन अनेक महावीरांच्या दुर्मीळ मूर्ती, हस्तलिखिते, साहित्य संकलित केले व ते इतिहास विभागात जमा केले. मागील चार वर्षांपूर्वी वायकोस गुरुजींकडे जैन धर्मीय मुनी महाराज पं.पू. पुनीतसागर महाराज यांनी विद्यापीठातील त्या वस्तूंचे अवलोकन करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार त्यांनी त्या सर्व वस्तू पाहिल्या आणि तेथूनच विद्यापीठात स्वतंत्र महावीर गॅलरी असावी, अशी संकल्पना पुढे आली. महासभेलाही ही संकल्पना मान्य झाली आणि समाजबांधवांकडून यासाठी निधी संकलित करण्याचे काम सुरू झाले.
संशोधनासाठी पूरक गॅलरी
महावीर गॅलरीमध्ये जैन धर्माचे विचार, तत्त्वज्ञान यावर संशोधन करण्यासाठी रिसर्च सेंटर सुरू केले जाणार आहे. संशोधक विद्यार्थ्यांना संदर्भग्रंथ, मूर्तीवरील शिलालेख, दुर्मीळ हस्तलिखिते उपलब्ध करून दिले जातील. इतिहास विभागातील म्युझियममध्ये हे साहित्य उपलब्ध आहे; पण ते सजपणे उपलब्ध करून देण्यासाठी जागा नव्हती. त्यामुळे ही गॅलरी उभारली जाणार आहे. विद्यापीठ जागा देईल आणि महासभा त्यांच्या खर्चातून इमारत उभारेल.
- डॉ. पुष्पा गायकवाड, इतिहास विभागप्रमुख
दुर्मीळ साहित्यही देणार
महावीर गॅलरी उभारण्यासाठी वास्तुविशारद, कंत्राटदार निश्चित झाले आहेत. इमारतीसाठी ७६ लाखांचा खर्च अपेक्षित आहे; परंतु बांधकाम साहित्याच्या वाढत्या किमतीमुळे हा खर्च १ कोटीच्या जवळपास जाऊ शकतो. महावीर गॅलरीमध्ये जैन चेअर स्थापन केली जाणार असून त्या माध्यमातून संशोधनाला प्रोत्साहन दिले जाईल. त्यासाठी आम्ही जैन धर्मासंबंधीची दुर्मीळ ग्रंथ, पुस्तकेही देणार आहोत.
- वसंत वायकोस गुरुजी, उपाध्यक्ष, दिगंबर जैन महासभा