महावितरणला ६५ कोटींचा चुना
By Admin | Published: February 17, 2016 11:51 PM2016-02-17T23:51:38+5:302016-02-18T00:07:00+5:30
औरंगाबाद : वीजबिल भरण्यास टाळाटाळ करायची अन् आकडा खूप मोठा होऊ द्यायचा. हा आकडा वाढल्यानंतर बिल भरण्यास असमर्थता दाखवायची आणि शेवटी महावितरण कंपनीकडून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित होऊ द्यायचा,
औरंगाबाद : वीजबिल भरण्यास टाळाटाळ करायची अन् आकडा खूप मोठा होऊ द्यायचा. हा आकडा वाढल्यानंतर बिल भरण्यास असमर्थता दाखवायची आणि शेवटी महावितरण कंपनीकडून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित होऊ द्यायचा, त्यानंतर तत्कालीन अभियंता, लाईनमन यांना हाताशी धरून दुसऱ्या नावाने नवीन कनेक्शन घ्यायचे, अशा प्रकारचे फंडे वापरून हजारो ग्राहकांनी महावितरण कंपनीला कोट्यवधी रुपयांचा चुना लावला आहे. बिल बुडविणाऱ्या शहरातील तब्बल ३० हजार ग्राहकांची यादी महावितरणने तयार केली आहे. त्यांच्याकडे ६५ कोटी रुपये थकले असून त्यांना कोर्टात खेचण्याची तयारी महावितरणने सुरू केली आहे.
औरंगाबाद शहरातील ४९ हजार १३८ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आलेला आहे. यापैकी ३० हजार ग्राहकांनी महावितरणचे ६५ कोटी रुपये बुडविल्याची माहिती मुख्य अभियंता सतीश चव्हाण यांनी दिली. ते म्हणाले की, औरंगाबाद परिमंडळामध्ये जालना औरंगाबाद शहर आणि ग्रामीण या विभागांचा समावेश आहे. जालना जिल्ह्यातील १ लाख २२ हजार ग्राहक तर औरंगाबाद ग्रामीण भागातील १ लाख ११ हजार ग्राहकांनी बिल न भरल्याने त्यांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला. यात ग्रामीण भागातील कृषिपंपांची संख्या अधिक आहे. यातील ८० टक्के ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होऊन अनेक वर्षे झाली आहेत. मात्र, असे असले तरी ज्या ठिकाणचा वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला आहे, त्या जागेवर जुने बिल भरल्याशिवाय नवीन कनेक्शन देऊ नये, असा नियम आहे, असे असताना संबंधित जागेवर आज खरेच वीज आहे अथवा नाही, याबाबतची पडताळणी करण्यासाठी स्वतंत्र पथक तयार केले जाणार आहे. एवढेच नव्हे तर वसुलीसाठीही आम्ही विशेष मोहीम राबवीत आहोत. मार्चमध्ये मोहिमेला सुरुवात होईल.