महावितरणला बसला १८ कोटींचा शॉक
By Admin | Published: October 8, 2016 01:04 AM2016-10-08T01:04:53+5:302016-10-08T01:15:02+5:30
औरंगाबाद : महावितरण कंपनीचे मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे १७ ते १८ कोटी रुपयांपर्यंतचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे
औरंगाबाद : महावितरण कंपनीचे मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे १७ ते १८ कोटी रुपयांपर्यंतचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अजूनही विभागातील पूर्ण पाहणी झाली नसून या नुकसानीमुळे वीजपुरवठ्याला मोठा फटका बसला आहे. नुकसानीचे युद्धपातळीवर आराखडे तयार करण्याचे आदेश प्रादेशिक प्रभारी संचालक तथा मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी यंत्रणेला दिले आहेत.
मराठवाड्यात आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे नांदेड, बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांत दाणादाण उडवून देऊन सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत करून टाकले. वीज आणि रस्त्यांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला. रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याखालोखाल वीजपुरवठा यंत्रणा कोलमडली आहे. सुमारे ३०० ते ४०० गावांना वीजपुरवठा करणाऱ्या लाईन अतिवृष्टीत तुटल्या. त्यामुळे ही गावे अंधारात आहेत. बीड जिल्ह्यातील सुमारे १५०० विजेचे खांब वाकले आहेत. नांदेडमध्ये २ हजारांहून अधिक खांब वाकले आहेत. उस्मानाबाद, लातूरमध्येही नुकसान झाले आहे. ट्रान्सफॉर्मर अजूनही पाण्याखाली आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर दुरुस्ती करणे शक्य होईल. तसेच चिखल आणि रस्ते नसल्यामुळे महावितरणच्या यंत्रणेला दुरुस्तीसाठी पोहोचणेही अवघड होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
महावितरण प्रादेशिक कार्यालयाचे प्रभारी संचालक तथा मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले की, बीड, उस्मानाबाद, नांदेड, लातूर जिल्ह्यांत तातडीने पाहणी करून आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत.