महावितरणच देते बिल; सौरउर्जेतून तयार वीज विकून ग्राहक मालामाल
By प्रसाद आर्वीकर | Published: May 17, 2023 04:38 PM2023-05-17T16:38:39+5:302023-05-17T16:41:15+5:30
नांदेडात दोन हजार नागरिकांनी तयार केली वीज अन् महावितरणला विकलीही !
नांदेड : विजेचा वापर वाढला आणि विजेवर होणारा खर्चही. पण जिल्ह्यातील १ हजार ८४९ नागरिकांनी स्वत:च्या घरावरच सौर पॅनल बसवून विजेची निर्मिती केली. स्वत: वापरली आणि उरलेली वीजमहावितरणला विकली देखील. त्यामुळे या ग्राहकांचे लाईट बिलाचे टेन्शन तर मिटलेच, पण विज निर्मितीतून फायदाही झाला आहे.
रुफ टॉप सोलार ही योजना महावितरण कंपनीच्या वतीने राबविली जाते. जिल्ह्यातील १ हजार ८४९ ग्राहकांनी या योजनेत सहभाग नोंदविला असून, २६ हजार ३६१ किलो वॅट क्षमतेच्या वीज निर्मितीचा टप्पा गठाला आहे. यामुळे ग्राहकांना वीज बिलापासून मुक्तता मिळाली आहे. सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेमुळे मासिक घरगुती वीज बिलात मोठी कपात होते. तसेच नेट मिटरींगद्वारे महावितरणकडून वर्षाअखेर शिल्लक वीजही विकत घेतली जाते. त्यामुळे ग्राहकांचा फायदा होतो, शिवाय पर्यावरणालाही हातभार लागतो.
नागरिकांनी याचा लाभ घ्यावा
सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेमुळे घरगुती वीज बिलात मोठी बचत होते. तसेच शिल्लक वीज महावितरणही विकत घेते. त्यामुळे ग्राहकांचा फायदा होतो. जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा.
- अनिल डोये, मुख्य अभियंता, महावितरण
या ग्राहकांनी केली वीज निर्मिती
नांदेड विभाग : १५२६
देगलूर विभाग : १५६
भोकर विभाग : ८९
ग्रामीण विभाग : ७८