कुरुपतेला सौंदर्य प्रदान करणारा महायज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 11:41 PM2018-12-17T23:41:08+5:302018-12-17T23:42:27+5:30
लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद चिकलठाणातर्फे आयोजित मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचा सोमवारी समारोप झाला. कुरुपतेला स्वरूपतेत बदलणारा महायज्ञ ठरले
औरंगाबाद : लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद चिकलठाणातर्फे आयोजित मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचा सोमवारी समारोप झाला. कुरुपतेला स्वरूपतेत बदलणारा महायज्ञ ठरलेल्या या शिबिरामुळे काहींचे दुभंगलेले ओठ जुळले, तर काहींची जुळलेली बोटे वेगळी झाली. चेहऱ्यावरील व्रण दूर होऊन काहींना सौंदर्य मिळाले, तर चिटकलेली जीभ वेगळी होऊन काही जणांना वाचाही मिळाली.
डॉ. शरदकु मार दीक्षित यांच्या स्मरणार्थ लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद चिकलठाणातर्फे एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे १३ डिसेंबरपासून प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरासाठी अमेरिकेहून आलेले डॉ. राज लाला, डॉ. संजय लाला, डॉ. ललिता लाला, डॉ. ओम अग्रवाल, डॉ. अमित बासनवार यांच्यासह अन्य डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून रुग्णांना नवीन आयुष्य दिले. शिबिरात दुभंगलेले ओठ, जुळलेली बोटे, पडलेली पापणी, व्रण आदींसंदर्भातील १४ डिसेंबर रोजी ८७, १५ डिसेंबर रोजी ७१, १६ डिसेंबर रोजी १०३ तर १७ डिसेंबर रोजी ९९ शस्त्रक्रिया झाल्या, तर याव्यतिरिक्त तिरळेपणाच्या एकूण २२ शस्त्रक्रिया झाल्या. चार दिवसांत तब्बल ३८२ रुग्णांवर शस्त्रक्रिया करून एकप्रकारे नवे जीवन देण्यात आले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी लायन्सचे अध्यक्ष सुरेश साकला, प्रकल्प प्रमुख राजेश लहुरीकर, सचिव डॉ. मनोहर अग्रवाल, भूषण जोशी, कल्याण वाघमारे, विनोद चौधरी, भरत भालेराव, राजकुमार टिबडीवाला, जयकुमार थानवी, मोहन हिंपलनेरकर, एम. टी. काझी,औरंगाबाद ड्रगिस्ट केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष रावसाहेब खेडकर, किशोर अग्रवाल, सतीश ठोले आदींसह एमजीएम येथील डॉक्टरांनी प्रयत्न केले.
जेवणही करता येत नव्हते
चिंचोली (परतूर) येथील आदेश सरोदे या पाचवर्षीय मुलाचे जन्मापासून दोन्ही हाताची बोटे जुळलेली होती. त्यामुळे अनेक बाबींसह स्वत:च्या हाताने जेवणही तो करू शकत नव्हता. शिबिरात शस्त्रक्रिया करून त्याच्या उजव्या हाताची बोटे मोकळी करण्यात आली. त्यामुळे यापुढे तो स्वत:च्या हाताने जेवू शकेल, याचा आनंद त्याच्या कुटुंबियाच्या चेहºयावर दिसत होता. शहरातील बारी कॉलनीतील तीनवर्षीय अफशान शेख रिजवान याची जीभ जन्मजातच चिटक लेली होती. त्यामुळे तीन वर्षे होऊनही तो बोलू शकत नव्हता. शिबिरात शस्त्रक्रिया झाल्यामुळे तो आता बोलू शकेल, याचा आनंद त्याच्या कुटुंबियाचा गगनात मावत नव्हता.
...आता लग्न जुळणार
लहानपणी मुलीच्या चेहºयाला कुत्र्याने चावा घेतला. मुलगी मोठी झाली तरी त्याचा व्रण कायम राहिला. त्यामुळे मुलीचे लग्न जुळण्याची चिंता पालकांना सतावत होती. शिबिरामुळे हा व्रण दूर झाल्याने मुलीचे लग्न जुळण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही, असे तिचे कुटुंबीय म्हणाले.