महायुतीने केला एमआयएमचा सफाया! राज्यात १६ उमेदवार, मालेगाव वगळता सर्व पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 11:09 AM2024-11-24T11:09:56+5:302024-11-24T11:12:51+5:30
मालेगाव वगळता पक्षाला कुठेच विजयी पताका लावता आली नाही. छत्रपती संभाजीनगरात शिंदेसेना, भाजपने एमआयएमचा सफाया केला.
छत्रपती संभाजीनगर : मुस्लीम मतांचे विभाजन टाळण्यासाठी ‘एमआयएम’ पक्षाने राज्यात फक्त १६ उमेदवार उभे केले होते. कमी उमेदवार उभे करून जास्तीतजास्त निवडून आणण्याचे धोरण पक्षाने स्विकारले. त्यासाठी पक्षप्रमुख खा.असदोद्दीन ओवेसी यांनी औरंगाबाद मध्य, पूर्व विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक घाम गाळला. मालेगाव वगळता पक्षाला कुठेच विजयी पताका लावता आली नाही. शहरात शिंदेसेना, भाजपने एमआयएमचा सफाया केला.
एमआयएम पक्षाला २०१४ ते २०१९ पर्यंत सर्वाधिक यश छत्रपती संभाजीनगर शहरात मिळाले. २०१४ मध्ये पहिल्याच विधानसभा निवडणुकीत इम्तियाज जलील निवडून आले. त्यानंतर, २०१५ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत २४ नगरसेवक निवडून आले. २०१९ मध्ये आ.जलील यांनी लोकसभा निवडणूक लढविली, त्यातही त्यांना यश मिळाले. पक्षाला एकानंतर एक यश मिळतच गेले. त्यामुळे नेत्यांचा उत्साहही वाढला होता. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेला जलील यांचा मोठा फरकाने पराभव झाला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत यंदा औरंगाबाद मध्य, पूर्व या दोनच मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले.
पक्षाचे नेते अकबरोद्दीन ओवेसी यांनी आमखास मैदानावर ऐतिहासिक सभा घेतली. सभेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून दोन्ही उमेदवार निवडून येणारच, असे सर्वांना वाटू लागले. त्यानंतर खा.असदोद्दीन आवेसी यांनी दोन्ही मतदारसंघांत छोट्या सभा घेऊन प्रचंड गर्दी खेचत होते. त्यांच्या पदयात्रांना प्रतिसाद मिळू लागला. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात अकबरोद्दीन ओवेसी यांनी पूर्व, मध्यसाठी रोड शो केला. त्यालाही मिळालेला प्रतिसाद बघण्यासारखा होता. मतदानाच्या दिवशी १०० टक्के मुस्लीम मतदान करून घेण्यात यंत्रणा अपयशी ठरली. त्यामुळे पूर्वमध्ये अवघ्या २,१६१, मध्य मतदारसंघात ८ हजार ११९ मतांनी पराभव स्विकारावा लागला. राज्यात फक्त मालेगाव येथील उमेदवार निवडून आले. विद्यमान आ.मुफ्ती मोहमद इस्माईल हेही फक्त ७५ मतांनी निवडून आले. एमआयएमच्या अन्य १५ उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला.