महेमूद दरवाजाचे काम लवकरच, अतिक्रमणे काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2021 07:24 PM2021-08-07T19:24:03+5:302021-08-07T19:29:09+5:30
Mahemood Darwaza : धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन मनपाच्या वॉर्ड कार्यालयाने दरवाजातील वाहतूक बंद केली आहे.
औरंगाबाद : ऐतिहासिक पानचक्कीच्या वैभवात भर घालणारा महेमूद दरवाजा मोडकळीस आला असून, दरवाजाची कमान (आर्च) मध्यभागी वाकली आहे. मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दरवाजाची वाताहत बघितली. स्मार्ट सिटीच्या निधीतून त्वरित कामाला सुरुवात करा, आसपासची अतिक्रमणेही काढावीत, असे निर्देश त्यांनी दिले.
स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील एकूण ९ दरवाजांची डागडुजी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. एकट्या महेमूद दरवाजाची अंदाजपत्रकीय रक्कम कमी असल्यामुळे कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यानच्या काळात दोन मोठ्या वाहनांनी मोडकळीस आलेल्या दरवाजाला धडक दिली. या अपघातांमुळे दरवाजाचा आर्च पूर्णपणे कोलमडला. धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन मनपाच्या वॉर्ड कार्यालयाने दरवाजातील वाहतूक बंद केली. परिसरातील नागरिक दरवाजाच्या पाठीमागून अत्यंत धोकादायक पद्धतीने ये-जा करीत आहेत. दोन ते तीन जण आतापर्यंत खाम नदीपात्रात पडले. मनपा प्रशासकांनी शुक्रवारी सायंकाळी पाहणी केली.
नागरिक दरवाजाच्या बाजूने ये-जा करीत असल्याने अपघाताची शक्यता आहे. त्यादृष्टीने त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या. दरवाजाचे काम त्वरित सुरू करा, आसपासची अतिक्रमणे त्वरित काढण्याचे निर्देश पाण्डेय यांनी दिले. घाटी रुग्णालय ते महमूद दरवाजापर्यंत असलेले विद्युत पोल हटविण्याचेही आदेश दिले. त्यांनी पानचक्कीला भेट देऊन पाहणी केली. कोहिनूर कॉलनी रोडवर मार्केट, पार्किंग विकसित करण्यासंदर्भात शहर अभियंता यांना सांगितले. ज्युब्लिपार्क चौकातील खड्डे पाहून प्रशासकांनी नाराजी व्यक्त केली. टाऊनहॉल उड्डाणपुलालगत कचरा आढळल्याने त्यांनी झोन क्रमांक १ च्या स्वच्छता निरीक्षकाची कानउघाडणी केली. रस्त्यावर पडलेल्या कचऱ्याबाबत बेजबाबदारपणा खपवून घेणार नाही, अशी ताकीद दिली. यावेळी शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता भागवत फड, स्मार्ट सिटीच्या स्नेहा बक्षी, अर्पिता शरद आदी उपस्थित होते.