महिला मंडळ म्हणतेय मंदिरात ड्रेसकोड हवा; मंदिर ट्रस्टच्या मते अजून तरी निर्बंधाची वेळ नाही
By संतोष हिरेमठ | Published: July 7, 2023 01:36 PM2023-07-07T13:36:44+5:302023-07-07T13:37:44+5:30
छत्रपती संभाजीनगरात मंदिरांबाहेर ‘ड्रेसकोड’विषयी लागले फलक
छत्रपती संभाजीनगर : शहरातील मंदिरांबाहेर लागलेला फलक वाचण्यात भाविक काहीसे मग्न होत आहेत. मंदिरात प्रवेश करताना स्कर्ट-टाॅप, हाफ पॅन्ट, बर्म्युडा, शाॅर्ट्स नको, अशी वेशभूषा नको, अशा आशयांचे हे फलक आहेत. शहरातील १५ ते २० मंदिरांबाहेर शहरातील एका महिला मंडळाने हे फलक लावले आहेत. मात्र, मंदिरात प्रवेश करताना ‘ड्रेस कोड’चे निर्बंध लावण्याची अजून तरी वेळ आलेली नाही, असे मंदिर ट्रस्टने स्पष्ट केले आहे.
सिडको हडको माहेश्वरी महिला मंडळाद्वारे समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी एक पाऊल उचलण्यात आले आहे. स्कर्ट टॉप, हाफ पॅन्ट, बर्म्युडा, शॉर्ट्स असे वस्त्र परिधान करून मंदिरात प्रवेश करू नये, यासाठी शहरातील विविध मंदिरांच्या परिसरात फलक लावण्यात आले. मंदिराचे पावित्र्य राखावे म्हणून शहरातील जवळपास १३ मंदिरांच्या परिसरात असे फलक लावण्यात लावण्यात आले आहे. भारतीय वेशभूषेत मंदिरात प्रवेश करावा, असे फलकावर नमूद करण्यात आल्याची माहिती मंडळातर्फे देण्यात आली.
संस्कृती टिकून
आपल्याकडे अजूनही संस्कृती टिकून आहे. नवी पिढीही धार्मिक आहे. मंदिरात कोणीही चुकीचे ड्रेस परिधान करून येत नाही. त्यामुळे मंदिरात ड्रेस कोड लागू केलेला नाही. मंदिराबाहेर पोस्टर लावू दिले.
- डाॅ. प्रवीण वक्ते, अध्यक्ष, गजानन महाराज मंदिर ट्रस्ट
अजून तरी गरज नाही
मंदिर व्यवस्थापनाची बैठक झालेली नाही. असे काही करायचे असेल तर बैठक घेऊन त्यात ठराव मांडावा लागतो आणि तो मंजूर करावा लागतो. ड्रेस कोड लागू करण्याची अजून तरी गरज वाटत नाही.
- ॲड. नरेंद्र देव, श्रीराम मंदिर, समर्थनगर
पोस्टर्समधून जनजागृतीवर भर
मंदिरात भारतीय वेशभूषेत जावे. मंदिर हे श्रद्धास्थान आहे. त्याचे पावित्र्य जपले पाहिजे. देशात अनेक ठिकाणी मंदिरात ड्रेस कोड लागू आहे. पोस्टर्सच्या माध्यमातून आपल्याकडेही त्याविषयी जनजागृती केली जात आहे. मंदिर परिसरात हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.
- प्रीती झंवर, अध्यक्ष, सिडको-हडको माहेश्वरी महिला मंडळ
ड्रेसकोड नको; पण मर्यादा पाळावी
मंदिरात ठराविक वेशभूषेतच प्रवेश करावा, असे बंधन करता कामा नये; परंतु सर्वसामान्यांना नागरिकांनीही मंदिरात प्रवेश करताना वेशभूषेविषयी मर्यादा पाळली पाहिजे.
- श्रद्धा पिंपळे, भाविक