मेहमूद गेटचे अवशेष निखळले; इतिहासतज्ज्ञांचा महापालिकेवर रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 01:51 PM2018-06-23T13:51:56+5:302018-06-23T13:52:29+5:30

जगप्रसिद्ध पाणचक्कीसमोरील मेहमूद दरवाजाचे अवशेष शुक्रवारी सकाळी ७ वाजता निखळले.

 Mahmud gate residues shudder; Historical Fury of the Municipal Corporation | मेहमूद गेटचे अवशेष निखळले; इतिहासतज्ज्ञांचा महापालिकेवर रोष

मेहमूद गेटचे अवशेष निखळले; इतिहासतज्ज्ञांचा महापालिकेवर रोष

googlenewsNext
ठळक मुद्देदरवाजाच्या आतील भागात असलेले लाकडी गेट अचानक निखळल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

औरंगाबाद : जगप्रसिद्ध पाणचक्कीसमोरील मेहमूद दरवाजाचे अवशेष शुक्रवारी सकाळी ७ वाजता निखळले. दरवाजाच्या आतील भागात असलेले लाकडी गेट अचानक निखळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. शहरात ५२ दरवाजांपैकी केवळ १४ दरवाजे शिल्लक राहिले आहेत. महापालिका प्रशासन या ऐतिहासिक दरवाजांकडे दुर्लक्ष करीत असल्याने वाताहत होत असल्याचा आरोप इतिहासतज्ज्ञांनी केला. 

पाणचक्कीच्या दर्शनी भागातच मेहमूद दरवाजा मागील ३५० वर्षांपासून दिमाखात उभा आहे. जगप्रसिद्ध पाणचक्की पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना याच दरवाजातून पुढे जावे लागते. खाम नदीवरील हा बुलंद दरवाजा पर्यटकांसाठीही आकर्षण केंद्र आहे. शुक्रवारी सकाळी ७ वाजता दरवाजातून नेहमीप्रमाणे वाहतूक सुरू असताना अचानक आतील लाकडी १५ फूट उंच आणि ८ फूट रुंद दरवाजा कोसळला. त्यामुळे परिसरात एकच धावपळ उडाली. सुदैवाने जेव्हा हा दरवाजा कोसळला तेव्हा गेटमधून एकही वाहन ये-जा नव्हती. नागसेनवन व विद्यापीठ परिसरात जाणारे विद्यार्थी तसेच कंपनीच्या कामगारांची सकाळी याच गेटमधून वर्दळ असते.

गेटच्या आतील भागातच लाकडी दरवाजा कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. शालेय विद्यार्थ्यांना मार्ग बदलून जावे लागले. सकाळी शासकीय कार्यालयांना ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांनाही मार्ग बदलून जावे लागले. सकाळी १० वाजता अग्निशमन दलाने लाकडी गेट बाजूला केल्यानंतर गेटमधील वाहतूक सुरळीत झाली. महापालिकेने यापूर्वीच दरवाजांकडे लक्ष दिले असते तर आज ही वेळच आली नसती, असा आरोप इतिहासतज्ज्ञ डॉ. रमजान शेख, डॉ. दुलारी कुरैशी आदींनी केला आहे. 

मनपाने युद्धपातळीवर दुरुस्ती करावी
शहरातील मोजक्याच आणि शिल्लक राहिलेल्या दरवाजांकडे महापालिकेने नेहमीच दुर्लक्ष केले. त्यामुळे एकानंतर एक ऐतिहासिक गेट नामशेष होत आहेत. शुक्रवारी सकाळी महेमूद दरवाजातील लाकडी भाग सागवानाचा आहे. पावसाच्या पाण्यामुळे खालील भाग पूर्णपणे सडला होता. त्यामुळे दरवाजा निखळला. महापालिकेने युद्धपातळीवर दरवाजा जशास तसा दुरुस्त करून बसवावा. गेटमधील दुसऱ्या बाजूचा लाकडी दरवाजाही पडू नये म्हणून मनपाने दुरुस्ती सुरू करावी.

जीव जाण्याची वाट पाहताय का?
मेहमूद दरवाजाला तडे गेले आहेत. त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे, ही बाब महापालिकेच्या निदर्शनास अनेकदा आणून दिली आहे. मनपाने गेटच्या दोन्ही बाजूने पूल उभारून रस्ता करण्याची योजना आखली आहे. त्याची अंमलबजावणी आजपर्यंत झाली नाही. उद्या गेट पडून निष्पाप नागरिकांचा जीव गेल्यावर महापालिका डागडुजी करणार आहे का?
- डॉ. दुलारी कुरैशी, इतिहास व पर्यटनतज्ज्ञ

Web Title:  Mahmud gate residues shudder; Historical Fury of the Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.