'फुले- आंबेडकरांनी भीक मागून शाळा चालवल्या'; चंद्रकांत पाटलांच्या विधानाने वाद, लगेच खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 06:18 PM2022-12-09T18:18:11+5:302022-12-09T18:19:12+5:30
राज्यातील भाजप नेत्यांकडून महापुरुषांविषयी वादग्रस्त वक्तव्ये सुरूच आहेत. त्यात चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याची भर पडली आहे.
औरंगाबाद: राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यांवरील वाद अजूनही सुरूच आहे, तोच आता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या एका वक्तव्याने वादाला तोंड फूटले आहे. या देशात कर्मवीर भाऊराव पाटील- महात्मा फुले- बाबासाहेब आंबेडकरांनी भीक मागून शाळा चालवल्या, असे वादग्रस्त वक्तव्य मंत्री पाटील यांनी केले आहे. यावरून आता सर्वत्र टीका होत आहे.
राज्यातील भाजप नेत्यांकडून महापुरुषांविषयी वादग्रस्त वक्तव्ये सुरूच आहेत. त्यात चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याची भर पडली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संचलित पैठण येथील संतपीठाचा पहिला प्रमाणपत्र वितरण सोहळा आज पार पडला. यावेळी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी अध्यक्षस्थानी होते. यावेळी पालकमंत्री संदीपान भुमरे रोहयो व फलोत्पादन मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, संतपीठाचे समन्वयक डॉ.प्रवीण वक्ते आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, तुम्ही अनुदानावर अवलंबून का रहाता? या देशामध्ये शाळा कुणी सुरू केल्या? कर्मवीर भाऊराव पाटील, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या सगळ्यांनी शाळा सुरू केल्या. या सगळ्यांनी शाळा सुरू करताना सरकारने त्यांना अनुदान दिले नाही. त्यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा सुरू करायच्या आहेत, आम्हाला पैसे द्या. त्याकाळी दहा रुपये द्यायचे. आता दहा-दहा कोटी रुपये देणारे आहेत, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
मंत्री पाटील यांनी केला खुलासा
दरम्यान, यावर मंत्री पाटील यांनी यावर खुलासा केला आहे. त्याकाळी वापरातील माधुकरी म्हणजे काय? हा प्रचलित शब्द आहे. भीक मागून संस्था चालवल्या असे म्हटले जाते. मी त्याबाबत भाषणात पुढे सीएसआर शब्द वापरला आहे, असा बचाव मंत्री पाटील यांनी केला आहे. तसेच माझ्या भाषणात कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबद्दल कौतुकच केले आहे, असेही ते म्हणाले.
वादग्रस्त वक्तव्यांची मालिकाच
औरंगाबादेतच काही दिवसांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ‘शिवाजी तो पुराने जमाने की बात है,’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यापूर्वी त्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरून निर्माण झालेला वाद अजून शमलेला नाही. राज्यपाल हटावच्या मागणीसाठी १७ डिसेंबरला महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईत विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. आता चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याची त्यात भर पडली आहे.