खासदार इम्तियाज जलील यांच्याविरुद्ध निवडणूक याचिका दाखल धर्माच्या नावावर मते मागितल्याचा मुख्य आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 12:35 AM2019-07-09T00:35:30+5:302019-07-09T00:35:59+5:30
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या निवडीस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात निवडणूक याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. जलील यांचे प्रतिस्पर्धी तथा बहुजन महापार्टीचे पराभूत उमेदवार शेख नदीम शेख करीम यांनी ही याचिका दाखल केली.
औरंगाबाद : औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या निवडीस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात निवडणूक याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. जलील यांचे प्रतिस्पर्धी तथा बहुजन महापार्टीचे पराभूत उमेदवार शेख नदीम शेख करीम यांनी ही याचिका दाखल केली.
एमआयएमचे पक्षप्रमुख खासदार असदोद्दीन ओवेसी आणि त्यांचे बंधू अकबरोद्दीन ओवेसी यांनी हिंदू आणि मुस्लिम समाजात तेढ निर्माण करणारी भाषणे केली असून, त्यांच्याविरुद्ध देशभरात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जलील यांनी धर्माच्या नावावर मते मागितल्याचा आक्षेप नदीम यांनी नोंदविला आहे. खा. जलील यांची निवड रद्द करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.
शेख नदीम यांनी अॅड. सिद्धेश्वर एस. ठोंबरे यांच्यामार्फत निवडणूक याचिका दाखल केली आहे. त्यांनी राष्टÑीय निवडणूक आयोग आणि १९-औरंगाबाद मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविलेल्या सर्व उमेदवारांना प्रतिवादी केले आहे.
याचिकेत म्हटल्यानुसार खा. जलील एआयएमआयएम पक्षातर्फे निवडणूक लढवून विजयी झाले आहेत. त्यांचे पक्षप्रमुख खा.असदोद्दीन ओवेसी आणि त्यांचे बंधू अकबरोद्दीन ओवेसी यांची दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या भाषणांची ‘यु-ट्यूब’वरून ‘डाऊनलोड केलेल्या ‘व्हिडिओ क्लीप’ याचिकेसोबत जोडल्या आहेत. जलील यांनी नामनिर्देशनपत्रासोबतच्या फॉर्म नंबर-२६ मध्ये खोटी माहिती सादर केली आहे. त्यांच्याविरुद्ध दाखल गुन्हा क्रमांक ६०/२०१६ ची माहिती त्यांनी लपविली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान मुस्लिम समाजातील राजकीय नेत्यांच्या छायाचित्रांसह काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुभाष झांबड यांचे छायाचित्र असलेल्या हस्तपत्रिका वाटण्यात आल्या.
खा. जलील हे मुस्लिम आहेत, त्यांना मतदान करण्याचे आवाहन ‘व्हॉटस्अॅप’ ग्रुपवर मुस्लिम समाजाला करण्यात आले होते. याबाबत याचिकाकर्त्याने १८ एप्रिल २०१९ रोजी निवडणूक अधिकाऱ्यांना तक्रार केली असल्याचे याचिकेत म्हटले आहे. तसेच जलील यांनी आफताब खानच्या सांगण्यावरून सय्यद महंमद अली हाश्मी नावाच्या अल्पवयीन मुलाची जलील यांना मतदान करण्याचे आवाहन करणारी व्हिडिओ क्लीप जारी केल्याचे म्हटले आहे. जलील यांच्या सहकाºयांनी औरंगाबाद जिल्ह्यातील मशिदींमध्ये बैठका घेऊन जलील यांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. याचिकाकर्त्याने १२ जून आणि २७ मे २०१९ रोजी याबाबत सिटीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. जलील यांनी १० ते १६ एप्रिल २०१९ दरम्यान धनादेशाऐवजी रोखीने ८२ हजार १२० रुपये रोख खर्च केले हे निवडणूक नियमाविरुद्ध असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.