प्रमुख पक्षांना बंडखोरांची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 01:10 AM2017-09-23T01:10:45+5:302017-09-23T01:10:45+5:30

मनपा निवडणुकीत प्रमुख पक्ष स्वबळ आजमावणार हे स्पष्ट झाले आहे. प्रमुख चारही पक्षांकडे इच्छुकांची मोठी गर्दी आहे. त्यामुळेच शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षाचा एबी फॉर्म देताना कसरत करावी लागणार असून प्रमुख पक्षांनी बंडखोरांची धास्ती घेतल्याचे चित्र आहे. दरम्यान, भाजपामध्ये उमेदवारांची नावे निश्चित करण्यावरुन धुसफूस सुरु असून मुख्यमंत्र्यांसमवेत मुंबईत झालेल्या बैठकीला मोजक्याच नेत्यांची उपस्थिती राहिल्याने कोअर कमिटीतील इतर सदस्यांत अस्वस्थता पसरली आहे.

The main parties are scared of the rebels | प्रमुख पक्षांना बंडखोरांची धास्ती

प्रमुख पक्षांना बंडखोरांची धास्ती

googlenewsNext

विशाल सोनटक्के ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : मनपा निवडणुकीत प्रमुख पक्ष स्वबळ आजमावणार हे स्पष्ट झाले आहे. प्रमुख चारही पक्षांकडे इच्छुकांची मोठी गर्दी आहे. त्यामुळेच शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षाचा एबी फॉर्म देताना कसरत करावी लागणार असून प्रमुख पक्षांनी बंडखोरांची धास्ती घेतल्याचे चित्र आहे. दरम्यान, भाजपामध्ये उमेदवारांची नावे निश्चित करण्यावरुन धुसफूस सुरु असून मुख्यमंत्र्यांसमवेत मुंबईत झालेल्या बैठकीला मोजक्याच नेत्यांची उपस्थिती राहिल्याने कोअर कमिटीतील इतर सदस्यांत अस्वस्थता पसरली आहे.
युती आणि आघाडीची आशा मावळल्यानंतर चारही प्रमुख पक्षांमध्ये उमेदवारांची नावे निश्चित करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. ८१ जागांसाठी निवडणूक होत असली तरी काँग्रेस आणि भाजपाकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळेच एबी फॉर्म वाटपानंतर नाराज झालेल्यांना आवरायचे कसे असा प्रश्न या पक्षांसमोर उभा आहे. शुक्रवारी विविध प्रभांगांसाठी तब्बल १७४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. काँग्रेसतर्फे प्राथमिक याद्या तयार झाल्यानंतर पक्षाचे नेते खा. अशोकराव चव्हाण यांनी या यादीला अंतिम स्वरुप दिले आहे. भाजपामध्ये मात्र काहींशी गोंधळाची स्थिती आहे. भाजपा मोठ्या ताकदीने निवडणूक मैदानात उतरत असली तरी पक्षाकडे शहरासाठी एकमुखी नेतृत्व नाही़ त्यामुळेच भाजपाच्या अडचणी वाढत आहेत. उमेदवारांच्या निवडीसाठी निवडणूक प्रभारी संभाजीराव पाटील निलंगेकर आणि पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आ़ सुजितसिंह ठाकूर यांच्या नेतृत्त्वाखाली २८ जणांची जम्बो कोअर कमिटी करण्यात आली. या कमिटीच्या उपस्थितीतच भाजपा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही पार पडल्या. याबाबतची जंत्री घेऊन याद्या निश्चित करण्यासाठी कोअर कमिटीची टीम मुंबईला जाऊन आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तब्बल दीड तास या कमिटीसाठी दिला. मात्र मुलाखती घेण्यासाठी असलेल्या २८ जणांपैकी मोजक्यांनाच यादी निश्चित करतेवेळी मुंबईला पाचारण केल्याने कोअर टीममधील उर्वरित सदस्य अस्वस्थ असल्याचे दिसून आले. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मुंबई येथे झालेल्या बैठकीला आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, आ.सुजितसिंंह ठाकूर यांच्यासह संतुक हंबर्डे, आ.प्रताप पाटील चिखलीकर, दिलीप कंदकुर्ते, चैतन्यबापू देशमुख, राम पाटील रातोळीकर, डॉ.धनाजीराव देशमुख, ओमप्रकाश पोकर्णा, डॉ.अजित गोपछडे, श्यामसुंदर शिंदे आदींची उपस्थिती होती. मात्र या बैठकीला माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पांढरे यांच्यासह माधवराव किन्हाळकर, माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर भाजपाचे आदी प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित नव्हते. विशेष म्हणजे, उपस्थित असलेल्यांपैकीही दोन नेत्यांना अधिकृत निमंत्रण मिळाले नव्हते मात्र अखेरच्या क्षणी त्यांना या बैठकीत सामावून घेतल्याचे समजते़ या बैठकीत नेमके कोणते उमेदवार निश्चित झाले हे गुलदस्त्यात असले तरी मुलाखतीसाठी असलेल्या इतर प्रमुख पदाधिकाºयांना का डावलले ? असा प्रश्न आता पक्षातीलच काही जणांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, शनिवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून याच दिवशी पक्षाने नेमके कोणाला मैदानात उतरविले हे ही स्पष्ट होणार आहे.

Web Title: The main parties are scared of the rebels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.