शहरातील सामाजिक सलोखा, शांतता अबाधित राखा; उद्योजकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 01:45 PM2023-03-11T13:45:16+5:302023-03-11T13:47:15+5:30
जी-२० च्या उत्तम नियोजनामुळे तयार झालेली प्रतिमा जोपासा
छत्रपती संभाजीनगर : शहरातील सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी सर्व विचारधारेच्या प्रमुखांना एकत्र बोलावून सामंजस्याने नामांतराचा विषय मार्गी लावत शांतता व सलोखा अबाधित राखावा, असे आवाहन करणारे पत्र शहरातील उद्योजकांच्या 'औरंगाबाद फर्स्ट' या संस्थेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवल्याची माहिती संस्थेचे माजी अध्यक्ष तथा उद्योजक मानसिंग पवार यांनी दिली.
'औरंगाबाद फर्स्ट' संस्थेचे विद्यमान अध्यक्ष प्रशांत देशपांडे, माजी अध्यक्ष मानसिंग पवार यांच्यासह इतरांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना शुक्रवारी पाठवले. या पत्रात म्हटले की, गेल्या काही दिवसांपासून शहराच्या नामांतरावरून परस्परविरोधी वक्तव्ये व निवेदने प्रसारित केली जात आहेत. त्यातून सर्वसामान्य जनतेत अस्वस्थता निर्माण होऊ शकेल, अशी शंका वाटते. सद्य:स्थितीत शहरांमध्ये कोणत्याही प्रकारची सामाजिक अशांतता निर्माण होणे हे कोणालाही परवडणारे नाही. अशांततेचा पहिला परिणाम दुर्दैवाने व्यापार, उद्योग, पर्यटन आणि पर्यायाने सामान्य माणसाच्या दैनंदिन रोजीरोटीवर होतो. लोकशाहीव्यवस्थेमध्ये प्रत्येकाला सार्वजनिकरीत्या आपले मत मांडण्याचा घटनादत्त अधिकार आहे; परंतु अशा अधिकाराचा वापर करीत असताना शांतपणे जीवन जगण्याच्या इतरांच्या अधिकारास बाधा येणार नाही, हे पाहणे सर्व समाजधुरीणांचे प्राथमिक कर्तव्य आहे. तरी सर्व संघटना, आस्थापनांची नम्र विनंती आहे की, या परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेला विराम देण्यासाठी सर्व विचारधारेच्या प्रमुखांना एकत्र बोलावून सामंजस्याने संबंधित विषय मार्गी लावत शांतता, सलोखा अबाधित राखावा.
जी-२० मुळे शहराचे नाव जागितक स्तरावर
नुकतीच झालेली जी-२० डब्ल्यू-२० बैठक प्रशासनामुळे अतिशय उत्तमपणे पार पडली आहे. या आयोजनात शहरातील सर्वच व्यावसायिक, व्यापारी व औद्योगिक संघटनांचा सक्रिय सहभाग होता. त्यानिमित्ताने शहराचे एक नवे रूप आपण जगाला दाखवू शकलो. जागतिक स्तरावर शहराचे नाव अधिक परिणामकारक पद्धतीने मांडता येण्याविषयीच्या आशा पल्लवित झाल्याचेही पत्रात म्हटले आहे.
शहरातील सामाजिक सौहार्द बिघडविण्याचा प्रयत्न
शहराच्या नामांतरावरून सुरू झालेले आंदोलन आणि समर्थनातून सामाजिक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. समर्थक आणि विरोधाकांकडून भडक वक्तव्य करण्यात येत आहे. आंदोलन, मोर्चा काढल्यानंतर त्यास प्रत्युत्तर दिले जात आहे. या आंदोलनामध्ये युवकांना अधिक प्रमाणात उचकवले जात आहे, असा अहवाल गुप्तचर विभागाने गृहमंत्रालयाला पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली. अहवालात शहरात कोणत्याही वेळी दंगलसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यादृष्टीने सुरक्षिततेसाठी अधिक कुमकही लागणार आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
पोलिसांवर सुरक्षेचा ताण
शहरात नामांतरावरून सुरू असलेल्या आंदोलनामुळे पोलिस यंत्रणेवर ताण आला आहे. सोशल मीडियात वादग्रस्त पोस्ट व्हायरल होऊ नये, यासाठी सायबर पोलिस रात्रंदिवस लक्ष ठेवून आहेत. कोणत्याही वेळी कुठेही आंदोलनाची परिस्थिती उद्भवू शकते, त्यामुळे सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त वाढविली आहे. आंदोलन, मोर्चाच्या ठिकाणी साध्या वेशात पोलिस लक्ष ठेवून आहेत. या बंदोबस्ताचा ताण पोलिस यंत्रणेवर आलेला आहे. त्यातच सहायक पोलिस आयुक्तांच्या सात जागा रिक्त आहेत. त्याशिवाय पोलिसांकडे गाड्यांसह इतरही यंत्रणा कमी पडत आहे. शहरातील काेणत्याही परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस विभागात अधिक सक्षमीकरणाची गरज वरिष्ठ पोलिस अधिकारी खासगीत व्यक्त करीत आहेत.
शहरातील शांततेला गालबोट लागू नये
शहरातील ताण-तणावाची परिस्थिती निवळण्यासाठी दोन्ही बाजूंनी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. जी-२०च्या बैठकीमुळे शहराविषयी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे शहरातील शांततेला गालबोट लागू नये, यासाठी प्रत्येकाने सामंजस्यांची भूमिका घेणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.
- मानसिंग पवार, उद्योजक