प्रदीप जैस्वालांसोबतची मैत्री जपली; ठाकरेसेनेची उमेदवारी सोडलेले तनवाणी शिंदेसेनेत
By बापू सोळुंके | Published: November 14, 2024 03:48 PM2024-11-14T15:48:03+5:302024-11-14T15:49:30+5:30
किशनचंद तनवाणी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
छत्रपती संभाजीनगर: 'मध्य' मतदारसंघातील हिंदू मतांची विभागाणी टाळण्यासाठी उद्धवसेनेकडून मिळालेली उमेदवारी परत करणाऱ्या किशनचंद तनवाणी यांनी आज गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. काही दिवसापूर्वीच त्यांनी उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तेव्हाच ते शिंदेसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा होती.
शहरातील औरंगाबाद-मध्य मतदारसंघासाठी शिवसेनेने आमदार प्रदीप जैस्वाल यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात उद्धवसेनेने जिल्हाप्रमुख किशनंचद तनावणी यांना उमेदवारी दिली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघा एक दिवस बाकी असताना तनवाणी यांनी पत्रकार परिषदेत मध्य मतदारसंघाच्या निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली होती. जैस्वाल हे उमेदवारी मागे घेत नाही आणि आपण उभे राहिल्यास मध्य मतदारसंघातील हिंदू मतांची विभागणी होईल आणि याचा लाभ 'एमआयएम'च्या उमेदवाराला होईल, यामुळे आपण निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले होते. तनवाणी यांच्या या धक्कादायक निर्णयामुळे 'मध्य' मतदारसंघाचा उमेदवार बदलण्याची नामुष्की उद्धवसेनेवर आला होता.
तेव्हा पक्षाने त्यांना तासभरात जिल्हाप्रमुख पदावरुन दूर केले होते. तनवाणी यांनी आठ दिवसापूर्वी उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून ते शिंदेगटाच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. या चर्चेवर आज गुरूवारी शिक्कामाेर्तब झाले. तनवाणी यांनी त्यांच्या समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सचीन झव्हेरी, सोमनाथ बोंबले, सुधीर नाईक, आदित्य दहिवाल यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
तनवाणी हे प्रामाणिक मित्र
किशनचंद तनवाणी हे प्रामाणिक मित्र आहेत. ते ज्या पक्षात असतात त्या पक्षाचे ते प्रामाणिकपणे काम करतात. शहराचे हित लक्षात घेऊन त्यांनी उद्धवसेनेने दिलेली 'मध्य' ची उमेदवारी परत केली. त्यासाठी त्यांनी पैसे घेतल्याचा आरोप खोटा आहे. तनवाणी यांच्यामुळे आपली विजयाची लीड आणखी वाढणार आहे.
-आ. प्रदीप जैस्वाल, शिंदेसेना उमेदवार मध्य मतदारसंघ