रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
By बापू सोळुंके | Published: November 15, 2024 05:45 PM2024-11-15T17:45:05+5:302024-11-15T19:22:45+5:30
कामगारांच्या येण्या-जाण्याच्या मार्गाजवळ असलेल्या मद्य निर्मितीसाठी आवश्यक मका साठवलेल्या टाकीत स्फोट
छत्रपती संभाजीनगर: शेंद्रा एमआयडीसीमधील मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपनीत मक्याची साठवणूक करुन ठेवण्यात आलेल्या टाकीचा स्फोट झाला. या घटनेत टाकीतील शेकडो टन मक्याच्या खाली अनेक कामगार दबले गेले आहेत. आतापर्यंत चार कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या जवानासह, करमाड पोलिसांनी आणि औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मक्याखाली दबलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
याघटनेविषयी प्राथमिक माहिती अशी की, शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील रॅडिको एन.व्ही.डिस्टलरीज ही मद्य निर्मिती कंपनी सन २००८ पासून कार्यरत आहे. या कंपनीत रोज ७०० ते ८०० कामगार कार्यरत असतात. या कंपनीच्या अंतर्गत असलेल्या स्टोअरेज विभाग आहे. तेथील एका टँकमध्ये ३ हजार टन क्षमतेच्या टाकीमध्ये मका साठवून ठेवण्यात आला होता. या टाकीजवळच कामगारांच्या येण्या-जाण्याचा मार्ग आहे. शु्क्रवारी दुपारी अडिच वाजेच्या सुमारास अचानक ही टाकी फुटली आणि त्यातील मक्याचा ढिगार तेथून ये-जा करणाऱ्या कामगारावर पडला. यामुळे हे कामगार मक्याच्या ढिगाराखाली दबल्या गेले. किती कामगार यात दबल्या गेले ,याची अचूक माहिती मिळू शकली नाही.
या घटनेची माहिती मिळताच तेथे दाखल झालेल्या अग्निशामक दल, पोलिस आणि कंपनीतील कामगारांनी मदतीसाठी धाव घेतली. तेव्हा चार कामगारांना बाहेर काढण्यात यश आले. यातील दोन कामगार बेशुद्ध होते. या चौघांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर शोध पथकाला चार कामगार मृत अवस्थेत आढळून आले आहेत. यासोबतच मक्याच्या ढिगाऱ्याखाली आणखी कामगार दबले असण्याची शक्यता लक्षात घेऊन जेसीबी आणि पोकलेनच्या मदतीने शोध मोहिम सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच औद्योगिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ अधिकारी पी.व्ही. सुरसे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
मृत आणि जखमी सर्व कंत्राटी कर्मचारी
किसन हिरडे ( ५० ), विजय गवळी ( ४०), दत्तात्रय बोरडे ( ४०) आणि आणखी एक अशा चार कामगारांचा मृतदेह मक्याच्या ढिगाऱ्याखाली शोध पथकाला आढळून आला. तर प्रशांत सोनवणे, प्रसाद काकड, वाल्मीक शेळके अशी जखमी कामगारांची नावे आहेत.