माजलगाव धरण @ 100
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 11:52 PM2017-10-24T23:52:45+5:302017-10-24T23:54:08+5:30
यावर्षी परतीचा पाऊस दमदार झाल्याने मंगळवारी सकाळी आठ वाजता माजलगाव धरण १०० टक्के भरले.
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : यावर्षी परतीचा पाऊस दमदार झाल्याने मंगळवारी सकाळी आठ वाजता माजलगाव धरण १०० टक्के भरले. हे धरण भरल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
मागील वर्षी परतीच्या पावसाने २५ सप्टेंबर रोजी दोन दिवस झालेल्या दमदार पावसामुळे केवळ २४ तासांत जोत्याखाली असलेले धरण पुर्ण क्षमतेने भरले होते. त्याचप्रमाणे यावर्षी मागील एक महिन्यात परतीच्या पावसाने या धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. १ आॅगस्ट रोजी माजलगाव धरणाची पाणीपातळी ४३०.६२ मिटर एवढी होती. एक महिन्यात हे धरण सव्वा मिटरने भरून मंगळवारी सकाळी आठ वाजता पुर्ण क्षमतेने म्हणजेच ४३१.८० मिटर एवढे झाल्याने ते १०० टक्के भरले आहे. सध्या धरणात ५६० क्युसेस एवढ्या पाण्याची आवक सुरू आहे. धरणात ३१२ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असुन एकूण ४५४ दलघमी एवढा पाणीसाठा उपलब्ध झाल्याची नोंद आहे.
धरण भरल्याने नागरिक व शेतक-यांमध्ये समाधान आहे. धरणातुन बीड, माजलगाव शहरासह अकरा खेड्यांना पाणीपुरवठा होत असल्याने पाणीप्रश्न सुटला आहे.