एकतर्फी प्रेमातून कॉलेजमध्ये ‘मजनू’चा धिंगाणा; मोबाईल हिसकावून पळाला, तरुणीस दिली धमकी
By सुमित डोळे | Published: June 21, 2023 05:31 PM2023-06-21T17:31:12+5:302023-06-21T17:31:34+5:30
गावाकडून आलेल्या तरुणाकडून तरुणीस बाहेर येण्यासाठी हट्ट, नकार दिल्याने घातला धिंगाणा
छत्रपती संभाजीनगर : एकतर्फी प्रेमातून गावातील मुलीला भेटण्यासाठी तरुणाने थेट शहरात येऊन ‘तिच्या’ महाविद्यालयात जात भेटण्याचा हट्ट केला. तरुणीने साफ नकार दिल्याने तिचा मोबाइल हिसकावला. आता तुझ्या नावाने आत्महत्या करतो, अशी धमकी देऊन धिंगाणा घातला. १९ जून रोजी भर रस्त्यावर हा प्रकार सुरू होता. ते पाहून स्थानिकांनी धाव घेताच त्याने मोबाइल फेकून पोबारा केला. रोहित सुनील वानखेडे असे या मजनूचे नाव आहे.
मूळची अकोला जिल्ह्यातील असलेली १९ वर्षीय खुशी (नाव बदलले आहे) शहरात एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकते. एकाच गावातील असल्याने रोहित तिच्या ओळखीचा होता. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून तिचा त्याच्याशी कुठलाही संपर्क नव्हता. रोहित मात्र एकतर्फी प्रेमातून सातत्याने बोलण्याचा प्रयत्न करीत होता. रोहितने सोमवारी सकाळी १० वाजता थेट खुशीचे महाविद्यालय गाठले. तिला कॉल करून भेटण्यासाठी बाहेर बोलावले. खुशी वसतिगृहातून महाविद्यालयाच्या गेटवर आली. तेथे रोहितने तिला सोबत बाहेर जाण्यासाठी हट्ट सुरू केला. खुशीने मात्र त्याला साफ नकार दिला.
मोबाइल हिसकावून पळाला
राग आलेल्या रोहितने तिच्यासोबत झटापट करून तिचा मोबाइल हिसकावला आणि पळत सुटला. आजूबाजूच्या नागरिकांच्या हा प्रकार निदर्शनास येताच काहींनी त्याच्या दिशेने धाव घेतली. पकडले जाण्याच्या भीतीने त्याने मोबाइल फेकून पळ काढला. स्थानिकांनी मोबाइल खुशीला परत दिला. त्यानंतर खुशीने थेट वेदांतनगर पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यावरून राेहितविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा शोध सुरू असल्याचे उपनिरीक्षक सुधाकर पाटील यांनी सांगितले.