वीज चोरीच्या प्रकरणात मोठी कारवाई; ११ प्रकरणांत गुन्हा दाखल
By साहेबराव हिवराळे | Updated: March 14, 2024 13:48 IST2024-03-14T13:47:39+5:302024-03-14T13:48:45+5:30
अनेक ग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार करून व आकडे टाकून वीज चोरी केल्याचे आढळून आले.

वीज चोरीच्या प्रकरणात मोठी कारवाई; ११ प्रकरणांत गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : नारेगाव व मिसारवाडी परिसरात वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांवर महावितरणने धडक कारवाई केली. याप्रकरणी सहायक अभियंता सतीश अधाने यांच्या फिर्यादीवरून सिडको पोलिस ठाण्यात ११ प्रकरणांत सोमवारी रात्री वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
महावितरणच्या चिकलठाणा एमआयडीसी शाखेचे सहायक अभियंता सतीश अधाने, त्यांचे सहकारी वरिष्ठ तंत्रज्ञ विनोद तित्तर, गोलाजी नागरे, एस. यू. साबळे, तंत्रज्ञ योगेश गायके व विद्युत सहायक अस्लम शेख व पंचांनी नारेगाव व मिसारवाडी परिसरामध्ये ऑगस्ट ते डिसेंबर २०२३ या कालावधीत वेगवेगळ्या दिवशी मीटर तपासणी मोहीम राबविली. त्यावेळी अनेक ग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार करून व आकडे टाकून वीज चोरी केल्याचे आढळून आले.
वीज चोरांची नावे (कंसात वीज चोरीची रक्कम रुपयांत) सय्यद सुरैय्या सय्यद रब्बानी (१२८५५), सय्यद फारूख सय्यद इमाम (९९८५), राजूशहा कांकरशहा सय्यद व वापरकर्ता शेख साजेद बेगम मगदूम (१२४४०), इम्रान खान इरफान खान (२५७२४), वापरकर्ता मकसूद शेख युसूफ शेख (२३३६०), इम्तियाज अहमद मोहंमद मुश्तकीम (१५०८५), राजेंद्र रामलक्ष्मण प्रसाद (२०२७६), पटेल चांद अहमद (२४५०), अब्दुल माजेद अब्दुल वाहेद (१२९४५), मालेका गफार खान (२०२७६) व चंद्रकला देवीदास अरण (७०८५).
आरोपींना वीज चोरीचे बिल देण्यात आले. मात्र, ते भरण्यास त्यांनी टाळाटाळ केली. अखेरीस सहायक अभियंता यांच्या फिर्यादीवरून सिडको पोलिस ठाण्यात आरोपींवर भारतीय विद्युत कायद्यानुसार सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.