नांदेडमध्ये वाळू माफियांवर मोठी कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांनी १६ ट्रकसह ५ जेसीबी, सक्क्षण पंप केले जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 10:46 PM2021-01-13T22:46:24+5:302021-01-13T22:48:49+5:30
Sand Mafia Crime News महसूल विभागाच्या बुधवारच्या कारवाईने वाळू माफियांवर सक्रांतच आली आहे.
नांदेड : जिल्ह्यात महसूल यंत्रणा ग्रामपंचायत निवडणुकीच्या लगबगीत असताना नांदेड तालुक्यात खुलेआम वाळू उपसा करणाऱ्यांवर बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कारवाई करीत तब्बल १६ ट्रक, ५ जेसीबी मशीन यासह वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारा एक सक्क्षण पंपही जप्त केला आहे. महसूल विभागाच्या बुधवारच्या कारवाईने वाळू माफियांवर सक्रांतच आली आहे.
नांदेड तालुक्यातील बोंढार येथे गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा आणि माती चोरी केली जात असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर नांदेड तहसीलचे नायब तहसीलदार मुगाजी काकडे यांचे पथक तेथे पाठविण्यात आले. महसूलच्या पथकाला पाहताच वाळू माफिया आणि माती चोरटे वाहने सोडून पळून गेले. यावेळी या पथकाने तब्बल १५ ट्रक आणि ३ जेसीबी जप्त केले. याठिकाणी पोलीस पथकासह प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारीही दाखल झाले.
या कारवाईदरम्यानच जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांना नांदेड तालुक्यातीलच थुगाव आणि पिंपळगाव कोरका येथेही अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली. उपविभागीय अधिकारी डॉ. लतीफ पठाण यांच्यासह जिल्हाधिकारी गोदावरी पात्रात पोहोचले. तेथे थुगाव येथे वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारी जेसीबी, १ ट्रक आणि १ सक्क्षण पंपही जप्त करण्यात आला. पिंपळगाव कोरका येथेही एक पोकलेन मशीन जप्त करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरूच होती. या कारवाईत मंडळ अधिकारी अनिरूध्द जोंधळे, तलाठी सचिन नरवाडे, सय्यद मोहसीन, उमाकांत भांगे, आकाश कांबळे, नारायण गाडे आदींची उपस्थिती होती.
जिल्ह्यात वाळू माफियांवरील कारवाईत खुद्द जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर हे सरसावले आहेत. एकीकडे जिल्ह्यात वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने सुरू असताना वाळू माफियांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. ऐन संक्रातीच्या आदल्या दिवशी ही कारवाई वाळू माफियांवर संक्रात आणणारीच ठरली आहे. यापुढेही कारवाई सुरूच राहिल असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी सांगितले.