देशभरातून कुठूनही व्हॉट्सॲप, ई-मेलद्वारे करा पोलिसांकडे ई-तक्रार ! अशी आहे पद्धत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 20:02 IST2024-08-27T20:01:19+5:302024-08-27T20:02:04+5:30
ई-तक्रार तक्रारीची दखल घेणे पोलिसांना बंधनकारक आहे.

देशभरातून कुठूनही व्हॉट्सॲप, ई-मेलद्वारे करा पोलिसांकडे ई-तक्रार ! अशी आहे पद्धत...
छत्रपती संभाजीनगर : नवीन फौजदारी कायद्यातील तरतुदींमुळे पोलिस विभागाच्या कार्यशैलीत मोठ्या प्रमाणात बदल झाले. दैनंदिन गुन्ह्याशी संबंधित प्रक्रियेसह प्रशासकीय कामकाजात या नव्या कायद्यांमुळे बदल झाले. आता नागरिकांना देशभरातून कुठूनही ई-तक्रार करता येणार आहे. त्या तक्रारीची दखल घेणे पोलिसांना बंधनकारक आहे. मात्र, ई-तक्रारीच्या तीन दिवसांमध्ये पीडित व्यक्तीने ठाण्यात जाऊन एफआयआरची प्रक्रिया पार पाडणे देखील आवश्यक आहे. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल.
१ जुलैपासून अंमलबजावणी
इंग्रजकालीन आयपीसी म्हणजेच ‘इंडियन पिनल कोड’चा वापर २०२४ मध्ये थांबवण्यात आला. १ जुलैपासून देशात ‘भारतीय न्याय संहिते’ला प्रारंभ झाला. यात कायद्यातील बदलांसह अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देत त्याला अधिकृत दर्जा देखील दिला आहे. छायाचित्रण, सीसीटीव्ही फुटेज, छायाचित्र, रेकॉर्ड केलेले संभाषण, कॉल रेकॉर्ड, लोकेशन आदी तांत्रिक बाबी कायदेशीररीत्या गृहित धरल्या जात आहेत. त्यामुळे व्हॉट्सॲप, ई-मेलद्वारे होणारी तक्रार देखील गृहीत धरली जाते.
येथे करा तक्रार
शहर पोलिसांच्या संकेतस्थळानुसार 8390022222 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता. त्याशिवाय https://aurangabadcitypolice.gov.in/ या संकेतस्थळावर शहराच्या १८ पोलिस ठाण्यांचे स्वतंत्र ई-मेलआयडी, प्रभारींचे संपर्क क्रमांक आहेत. त्यावर देखील तक्रार करु शकता.
ई-तक्रारची दखल घेतली जाते
पोलिस महासंचालक कार्यालयाने मुख्य पोलिस घटकासह त्या अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक पोलिस ठाण्याला स्वतंत्र ई-मेल आयडी दिले आहे. संकेतस्थळावर ते उपलब्ध आहे. नागरिक त्यावर तक्रार करु शकतात. त्याची निश्चित दखल घेतली जाते. एफआयआरसाठी तीन दिवसांत तक्रारदाराला ठाण्यात यावे लागते.
- डॉ. रणजित पाटील, सहायक पोलिस आयुक्त, उस्मानपुरा विभाग.