महिला बचत गटांसाठी बाजारपेठ उपलब्ध करा-अशोकराव चव्हाण
By Admin | Published: March 20, 2016 12:57 AM2016-03-20T00:57:53+5:302016-03-20T01:05:52+5:30
नांदेड : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महिला बचत गटांना तालुकास्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून दिली पाहिजे,
नांदेड : ग्रामीण भागातील महिला बचतगटाच्या माध्यमातून स्वावलंबी होत असून उत्पादनक्षमता, चिकाटी व परिश्रमाची तयारी असल्यामुळे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महिला बचत गटांना तालुकास्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून दिली पाहिजे, अशी सूचना माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी केली़
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील महिला बचत गटांच्या वस्तूंचे जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री मल्टीपर्पज हायस्कूलच्या मैदानावर आयोजित केले आहे़ या प्रदर्शनाचे उद्घाटन खा़ चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी झाले़ यावेळी ते बोलत होते़ कार्यक्रमास आ़ डी़ पी़ सावंत, आ़ वसंतराव चव्हाण, जि़ प़ अध्यक्षा मंगला गुंडले, जि़ प़ शिक्षण सभापती संजय बेळगे, अतिरिक्ति मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, गुलाबसिंह राठोड, सुमिता व्याहाळकर, इंदिरा गांधी महिला बचत गट संघटनेच्या जिल्हाध्यक्षा महादेवी मठपती, अॅड़ एऩ एम़ रानोळकर यांची उपस्थिती होती़ प्रशासनाने या बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत़ मार्केटिंगच्या बाबतीत लक्ष देवून तालुकास्तरावर विक्री केंद्र सुरू केले पाहिजे़ दुष्काळाच्या काळात या बचत गटांनी अधिक चांगले काम करून आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही खा़ चव्हाण यांनी बचतगटांना केले़
सुमती व्याहाळकर म्हणाल्या, बचत गटातील महिलांनी बँकेचे कर्ज घराचे बांधकाम, लग्न, आजारासाठी नव्हे, तर उद्योगासाठी घ्यावे़ तरच बचत गट सक्षम होतील़
प्रास्ताविक प्रकल्प संचालक सुधीर भातलवंडे यांनी केले़ सूत्रसंचालन प्रदीप सोनटक्के, सतीश कावडे यांनी तर जी़ बी़ सुपेकर यांनी आभार मानले़
ग्रामीण भागातील महिला बचत गटांना खा़ अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले़ सन २०१३- १४ या वर्षात प्रथम पुरस्कार अर्धापूर तालुक्यातील उमरी येथील सरस्वती महिला बचत गटाला, द्वितीय कंधार तालुक्यातील शेकापूर येथीली साईबाबा महिला बचत गट व तृतीय पुरस्कार हदगाव तालुक्यातील तामसा येथील राजश्री बचत गटाला देण्यात आला़
२०१४- १५ चा प्रथम पुरस्कार अर्धापूर तालुक्यातील उमरी येथील समंत महिला बचत गट, पाथरड येथील आम्रपाली महिला बचत गट व तृतीय तेलंगवाडी येथील जिजामाता महिला बचतगट यांना पुरस्कार देण्यात आला़ प्रथम १० हजारांचा तर द्वितीय पुरस्कार ५ हजार रूपयांचा आहे़ (प्रतिनिधी)
काँग्रेसच्या काळात शासनाने महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले होते़ त्यामुळे गावपातळीवर महिला बचत गटांचे जाळे निर्माण झाले़ नांदेड जिल्ह्यात १९८० साली बचत गटांसाठी योजना सुरू झाली तेव्हापासून आजपर्यंत १९ हजार ६०० बचत गट स्थापन झाले आहेत़ त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महिलांच्या सक्षमीकरणाची संधी आहे़