रेल्वेस्थानकावर सरकता जिना बसविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 11:53 PM2017-08-04T23:53:51+5:302017-08-04T23:53:51+5:30
परभणी रेल्वे स्थानकावर वयोवृद्ध व अपंग प्रवाशांसाठी लवकरच सरकता जीना बसविला जाईल, असे आश्वासन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले असल्याची माहिती खा.बंडू जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी रेल्वे स्थानकावर वयोवृद्ध व अपंग प्रवाशांसाठी लवकरच सरकता जीना बसविला जाईल, असे आश्वासन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले असल्याची माहिती खा.बंडू जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.
या संदर्भात माहिती देताना खा.बंडू जाधव म्हणाले की, मराठवाड्यातील रेल्वेच्या अनेक समस्या आहेत. या समस्या रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कानावर घालण्यासाठी शुक्रवारी नवी दिल्ली येथे त्यांची भेट घेतली. यावेळी प्रभू यांना परभणी रेल्वे स्थानकावर अपंग व वयोवृद्ध प्रवाशांसाठी लिफ्ट व सरकता जीना बसविण्यात यावा, नांदेड- पनवेल या रेल्वेला गंगाखेड येथे थांबा देण्यात यावा, परभणी, हिंगोली, नांदेड येथील प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी आणखी एक नवीन रेल्वेगाडी सुरु करण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी रेल्वेमंत्री प्रभू यांनी परभणी रेल्वे स्थानकावर लिफ्ट व सरकता जिना तातडीने बसविण्यात येईल. तसेच नांदेड- पनवेल रेल्वेला गंगाखेड येथे थांबा देण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले. यावेळी मराठवाड्यातील रेल्वे स्टेशनच्या बाहेरील अतिक्रमणे हटवून त्या ठिकाणी दुकाने उभारुन ती किरायाणे दिल्यास रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होईल, हा मुद्दाही चर्चिला गेला. तसेच रेल्वेमधील खाद्यपदार्थ व पाणी विक्री अनधिकृतरीत्या होत असून त्याबाबत अधिकृत परवानगी दिल्यासही रेल्वेच्या उत्पन्नात भर पडेल, असाही मुद्दा मांडण्यात आला. अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना रेल्वे प्रवासात सूट दिली जाते. परंतु, आरक्षणात कोटा दिलेला नाही. त्यामुळे पत्रकारांसाठी आरक्षण कोटाही लागू करावा, अशीही मागणी यावेळी खा. जाधव यांनी केली. तसेच या व्यतिरिक्त मराठवाड्यातील रेल्वेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. त्यावर प्रभू यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे खा. जाधव यांनी सांगितले. यावेळी खा.श्रीरंग बारणे, खा.विनायक राऊत, खा.श्रीकांत शिंदे आदींची उपस्थिती होती.