निर्णयक्षम बना
By Admin | Published: September 15, 2014 12:51 AM2014-09-15T00:51:36+5:302014-09-15T00:57:57+5:30
औरंगाबाद : जगातील प्रत्येक देशाची संस्कृती वेगळी आहे; परंतु जागतिक स्तरावर ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांचे प्रश्न मात्र, कमी-अधिक प्रमाणात सारखेच आहेत.
औरंगाबाद : जगातील प्रत्येक देशाची संस्कृती वेगळी आहे; परंतु जागतिक स्तरावर ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांचे प्रश्न मात्र, कमी-अधिक प्रमाणात सारखेच आहेत. महिला कर्मचाऱ्यांनी हे प्रश्न स्वत:पर्यंतच न ठेवता त्यांच्या विरुद्ध आवाज उठवावा. त्यासाठी महिला कर्मचाऱ्यांनी एकमेकींसोबत संपर्क वाढविला पाहिजे, असे ‘आयटीएफ’च्या लंडन मुख्यालयाच्या महिला समितीच्या प्रमुख जोडी इवान यांनी म्हटले.
महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेतर्फे राज्य परिवहन महामंडळातील महिला कर्मचारी, महिला कामगारांसाठी रविवारी ‘संघटना बळकटीकरणासाठी महिलांशिवाय पर्याय नाही’ याविषयी राज्यव्यापी शिबीर घेण्यात आले. त्यात जोडी इवान यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी संघटनेचे महासचिव हनुमंत ताटे होते. यावेळी आशिया पॅसिफिक राष्ट्राच्या महिला समन्वयिका व दिल्ली कार्यालयाच्या प्रमुख निशी कपाही, महिला आघाडीच्या संघटक शीला नाईकवाडे, राज्य उपाध्यक्ष विजय पोफळे, प्रादेशिक सचिव मधुकर बोर्डे, विभागीय सचिव राजेंद्र मोटे यांची उपस्थिती होती. २०१२ ते २०१६ या कालावधीच्या कामगार करारात महिला कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा निर्णय झालेला आहे. त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.
महिला कर्मचाऱ्यांना स्वतंत्र विश्रामगृहांची व्यवस्था करणे, वाहक व कार्यशाळेतील पदावर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना रात्रपाळी न देणे, महिला वाहकावर प्रवाशांकडून होणारे हल्ले, छेडछाड, शिवीगाळ, धमक्या इ. प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना करणे, तसेच लैंगिक छळ तक्रार निवारण समितीने आलेल्या तक्रारीवर पारदर्शक चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे. जोडी इवान यांनी ९ सप्टेंबरपासून मुंबई, पुणे, नगर, नाशिक भागांत प्रवासात महिला वाहक, कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.
ट्रान्सपोर्ट क्षेत्रात काम करूनही महिलांना घरी जायला वाहतुकीची सुविधा मिळत नाही. सर्वत्र समस्या सारख्या असताना त्यांचे प्रतिनिधित्व कोणी करीत नाही. डिसिजन मेकर बनण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे निशी कपाही म्हणाल्या.
४नोकरीदरम्यान गर्भपातासारख्या समस्येलाही महिला वाहकांना सामोरे जावे लागत असल्याचे शीला नाईकवाडे यांनी सांगितले.