कुलगुरूंच्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:28 AM2018-03-27T00:28:34+5:302018-03-27T00:36:56+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी बेकायदा नेमणुका, खरेदी, संशोधन पेपरमध्ये मोठा आर्थिक घोटाळा केला आहे. या घोटाळ्यांची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करावी, या चौकशीच्या कार्यकाळात कुलगुरूंचे अधिकार गोठविण्यात यावेत, अशी मागणी विधान परिषदेत मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी बेकायदा नेमणुका, खरेदी, संशोधन पेपरमध्ये मोठा आर्थिक घोटाळा केला आहे. या घोटाळ्यांची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करावी, या चौकशीच्या कार्यकाळात कुलगुरूंचे अधिकार गोठविण्यात यावेत, अशी मागणी विधान परिषदेत मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली.
विधानपरिषदेत नियम २०७ अन्वये राज्यातील शिक्षणाविषयी चर्चा झाली. या चर्चेत विद्यापीठातील मागील दोन वर्षांत झालेल्या भ्रष्टाचारावर विविध आमदारांनी ताशेरे ओढले. यात बोलताना आ. चव्हाण यांनी बनसारोळा येथील एका अपंग प्राध्यापकाची नियमाप्रमाणे निवड झाली. मात्र ब्लॅकमेल करणारांचे ऐकून कुलगुरूंनी चौकशी समिती नेमली. या चौकशी समितीमध्ये ज्यांनी तक्रारी केल्या अशाच लोकांचा समावेश केला. याप्रकरणी कुलगुरू, राज्य सरकार, राज्यपाल यांच्याकडे तक्रारी केल्या. मात्र काहीच झाले नाही. विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाच्या नियुक्त्यांमध्ये जे प्रभारी अधिष्ठाता नेमले त्यांनी रात्री दहा वाजता बैठक घेऊन नेमणुका केल्या. या अपात्र लोकांनाही पत्रे देण्यात आली. अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळावर नेमणूक केलेल्या एका सदस्याने राजीनामा दिला. ती रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया स्थायी समितीतर्फे करण्यात येते. मात्र कुलगुरूंनी त्याठिकाणी एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याला नेमणुकीचे पत्र दिले. या नेमणुकीविषयी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ताशेरे ओढले. शेवटी विद्यापीठ प्रशासनाने अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष निवडीसाठी नियमानुसार निवडणुका घेण्याचा प्रस्ताव दिला. कायद्याचे तीनतेरा वाजविण्यात आले आहेत. विद्यापीठात विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी नाही. कुलगुरू अर्थसंकल्पामध्ये स्वत:च्या घरात जीम उभारण्यासाठी २ लाख रुपयांची तरतूद करतात. मागील वर्षीही एवढीच तरतूद केलेली होती. विद्यापीठाचा सर्व कारभार प्रभारींवर सुरू आहे. यामुळे कुलगुरूंची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करण्यात यावी, ही चौकशी होईपर्यंत कुलगुरूं चे अधिकार गोठवावेत, अशी मागणीही आ. चव्हाण यांनी केली. यावर उच्चशिक्षणमंत्री विनोद तावडे मंगळवारी उत्तर देणार आहेत.
गोपीनाथ मुंडे संस्थेला निधी द्या
विद्यापीठात स्थापन करण्यात आलेल्या गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि संंशोधन संस्थेला तीन वर्षांपासून राज्य सरकार एक रुपयाही देत नाही. १५० कोटी रुपयांची घोषणाच करण्यात आलेली आहे. विद्यापीठ स्वत:च्या स्थानिक निधीतून ४ कोटी रुपयांची तरतूद करते. सरकारने निधी देण्याची मागणी आ. चव्हाण यांनी केली. राज्यात साडेनऊ हजार प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. त्या भराव्यात, सीएचबीच्या प्राध्यापकांचे मानधन वाढविणे आदींचा समावेश आहे.
कुलगुरूंचा संशोधन घोटाळा धक्कादायक
कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या पुणे विद्यापीठातील पीएच. डी.च्या विद्यार्थ्यांसोबत संशोधन पेपर आंतरराष्ट्रीय मासिकांमध्ये प्रकाशित केले. याचे बिल मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या निधीतून देण्यात आले. याशिवाय १ कोटी रुपयांचे उपकरण ६ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. अशा विविध आर्थिक भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, असेही आ. चव्हाण यांनी सांगितले.