‘ई-पास’शिवाय करा उद्यापासून एसटी प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:04 AM2021-06-06T04:04:26+5:302021-06-06T04:04:26+5:30
औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अडीच महिन्यांपासून ठप्प असलेली एसटी महामंडळाची बससेवा ७ जूनपासून सुरू होणार आहे. एसटी प्रवासासाठी ...
औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अडीच महिन्यांपासून ठप्प असलेली एसटी महामंडळाची बससेवा ७ जूनपासून सुरू होणार आहे. एसटी प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे एसटी बसच्या वाहतुकीवर निर्बंध आले. त्यामुळे ५० दिवसांपासून ‘एसटी’चा चक्का जाम झाला होता. एसटी केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच धावत आहे, परंतु त्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. परिणामी, एसटीला कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी फेरावे लागले. राज्य शासनाने अखेर पूर्ण आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्यासाठी एसटी महामंडळाला परवानगी दिली. त्यामुळे सोमवारपासून एसटी बससेवा पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे धावण्यास सुरुवात होणार आहे. प्रारंभी काही ठरावीक मार्गांवर बस सोडण्याचे नियोजन एसटी महामंडळच्या औरंगाबाद विभागाने केले आहे. प्रवाशांच्या गर्दीनुसार बस सोडण्यात येणार आहे. संपूर्णपणे निर्जंतुकीकरण करून बस मार्गांवर सोडण्यात येईल आणि आसन क्षमतेनुसार प्रवाशांची वाहतूक करण्यात येईल, अशी माहिती विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली.
मध्यवर्ती बस स्थानकातून या बसेस
-औरंगाबाद-पुणे
-औरंगाबाद-अकोला
-औरंगाबाद-नाशिक
-औरंगाबाद-जळगाव
-औरंगाबाद -भुसावळ
-औरंगाबाद -शिरपूर
-औरंगाबाद-धुळे
-औरंगाबाद-शेगाव
------
सिडको बस स्थानकातून या बसेस
-औरंगाबाद-पुणे
-औरंगाबाद-नागपूर
-औरंगाबाद -अकोला
-औरंगाबाद -यवतमाळ
-औरंगाबाद- लातूर
-औरंगाबाद- सोलापूर
-औरंगाबाद- तुळजापूर
-औरंगाबाद - बुलडाणा
-औरंगाबाद - बीड
-औरंगाबाद-जालना
-------
जिल्ह्यातील बससेवा
पैठण आगारातून पुणे, बुलडाणा, भुसावळ, जालना, सिल्लोड आगारातून पुणे, मालेगाव, जालना, वैजापूर आगारातून पुणे, जळगाव, बुलडाणा, मालेगाव, कन्नड आगारातून पुणे, सोलापूर, शेगाव, शहादा, गंगापूर आगारातून पुणे, यवतमाळ, मलकापूर, बुलडाणा, मालेगाव आणि सोयगाव आगारातून जळगाव, बीड, धुळ्यासाठी बस सोडण्यात येणार आहेत.