बदल्या ऑनलाईनच करा; शिक्षक संघटनांची शासनाच्या अभ्यासगटासमोर मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 11:56 AM2020-02-12T11:56:10+5:302020-02-12T11:59:03+5:30
शिक्षकांच्या सर्व संघटनांची राज्य शासनाच्या अभ्यासगटासमोर मागणी
औरंगाबाद : शिक्षकांच्या बदल्यांमागील ‘अर्थकारण’ आणि वशिलेबाजी रोखण्यासाठी आधीप्रमाणे ऑनलाईनच बदल्या कराव्यात, अशी मागणी राज्य शासनाने नेमलेल्या अभ्यासगटासमोर सोमवारी सर्व शिक्षक संघटनांनी केली. ऑनलाईन बदल्यांवर आक्षेप आल्यामुळे नूतन सरकारने शिक्षकांच्या बदल्यांच्या धोरणाचे पुनर्विलोकन करण्यासाठी पाच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा अभ्यासगट नेमला आहे. या अभ्यासगटाची पहिली बैठक पुण्यात सोमवारी झाली. या बैठकीत ४० पेक्षा अधिक शिक्षक संघटनांचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी उपस्थित होते. अभ्यासगटाचे अध्यक्ष, पुणे जिल्हा परिषदचे अध्यक्ष पीयूष प्रसाद यांनी सर्व प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेतले.
शिक्षकांच्या मागण्या काय ?
१. आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत जिल्हा परिषद सेवा नियम १९६७ मधील कलम ८ (६) नुसार मूळ प्रवर्ग व निवड प्रवर्ग, असे दोन पर्याय पर्याय शिक्षकांना द्यावेत, १० टक्के मनुष्यबळाची अट लावून कोणाताही जिल्हा बदली प्रक्रियेतून वगळू नये, साखळी बदल्या कराव्यात, किमान दोन जिल्ह्यांचा पर्याय ठेवावा, आंतरजिल्हा बदल्यांसाठी राज्यरोस्टर, शून्य बिंदुनामावली करावी, लगतच्या जिल्ह्यातील पती-पत्नीला सार्वत्रिक बदल्यांत एकत्रीकरणाचा लाभ द्यावा, आदी मागण्या खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघातर्फे केल्याची माहिती सनीदेवल जाधव यांनी दिली.
२. पहिल्या टप्प्यापासून आंतरजिल्हा बदली होऊनही अद्याप कार्यमुक्त न केलेल्या कोकणातील शिक्षकांना लवकरात लवकर कार्यमुक्त करावे, संवर्ग- १ मधून लाभ घेणाऱ्या शिक्षकांना एका शाळेवर कमीत कमी ३ वर्षे सेवा करण्याची मुदत असावी, दहा टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिक्त असलेल्या जिल्हा परिषदमधील शिक्षकांचा समावेश आंतरजिल्हा बदली टप्पा क्रमांक-४ मध्ये केला जाणार नाही, ही अट वगळून त्या शिक्षकांचा/ जिल्ह्यांचा समावेश बदली टप्पा क्रमांक ४ मध्ये करण्यात यावा, बिंदुनामावली रोस्टर हे जिल्ह्यावर न ठेवता ते विभागावर, राज्यवार करण्यात यावे. बदलीपात्र शिक्षकाला पाच जिल्ह्यांचा पर्याय देण्याचा विचार व्हावा, आदी मागण्या करण्यात आल्याची माहिती शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांनी दिली.