आपले गाव आदर्श बनवा

By Admin | Published: August 11, 2014 12:21 AM2014-08-11T00:21:47+5:302014-08-11T00:25:29+5:30

हिंगोली : शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून आपले गाव आदर्श बनवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी हिंगोली तालुक्यातील जांभरून आंध येथे केले.

Make your village ideal | आपले गाव आदर्श बनवा

आपले गाव आदर्श बनवा

googlenewsNext

हिंगोली : शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून आपले गाव आदर्श बनवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी हिंगोली तालुक्यातील जांभरून आंध येथे केले.
शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत ८ आॅगस्ट रोजी सायंकाळी जांभरून येथे कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास उपविभागीय महसूल अधिकारी खुदाबक्ष तडवी, तहसीलदार विद्याचरण कडवकर, विभागीय वन अधिकारी चंद्रशेखर सरोदे, गावच्या सरपंच लहिजाबाई जुमडे, कळमनुरीचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी धाबे, पोलीस निरीक्षक केंद्रे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रारंभी ग्रामस्थांनी विविध समस्या मांडल्या. यावेळी आरोग्यसेवा, शिक्षण, घरकुल, रेशन, रोहयो या बाबतच्या अडचणी जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या. जांभरून हे गाव आदिवासीबहुल असल्या कारणाने आदिवासींच्या योजनांबाबतही काही ग्रामस्थांनी प्रश्न विचारले. तसेच ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले. जिल्हाधिकारी कासार म्हणाले की, ग्रामस्थांनी आरोग्याच्या बाबतीत सदैव सजग रहावे, महिलांसोबत बालकांच्या आरोग्याची काळजी घेतल्यास सदृढ पिढी निर्माण होईल, आरोग्य विषयक शासकीय उपक्रमांचा लाभ घ्यावा. उपचारासाठी कुठलाही खर्च करावा लागत नाही. गरोदर महिलांनी आशा स्वयंसेविकांच्या संपर्कात रहावे, बालकांना वेळेवर लसीकरण करावे, मुलींचे लग्न १८ वर्ष पुर्ण झाल्यानंतर करावे. ते म्हणाले की, उघड्यावर शौचास बसू नका, शासनाच्या योजनेचा लाभ घेवून घरोघरी शौचालय बांधा, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाच्या योजनेचा लाभ घेवून शेततळी, विहिरी यासह जलसंधारणाचे विविध उपक्रम राबवा, आधुनिक पद्धतीने शेती करा, जन्म-मृत्यूची नोंद वेळेवर करा, यावेळी वारसांची नावे लावण्याबाबतची कार्यवाही तातडीने पुर्ण करून चावडी वाचन करण्याबाबतची सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. मुलांना शाळेत घाला. त्यांची अभ्यासातील प्रगती जाणून घेण्यासाठी पालकांनी महिन्यातील एक दिवस शाळेसाठी द्यावा, रेशनच्या धान्याचा पुरवठा व्यवस्थित होतो काय? यासाठी ग्रामदक्षता समितीने दक्ष रहावे, ग्रामस्थांनी कुठल्याही व्यसनाच्या आहारी जावू नये, गावाच्या प्रगतीसाठी शासनाच्या योजना समजून घ्या, अडचणी असल्यास संबंधित अधिकाऱ्यांना भेटा, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. काही ग्रामस्थांना वन विभागाच्या वतीने गॅस किटचे वाटप करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Make your village ideal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.