बसस्थानकातून अपहरण करून मालेगावात नेत विष पाजून व्यावसायिकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 06:56 PM2019-06-01T18:56:28+5:302019-06-01T19:00:39+5:30
मालेगाव कॅम्प परिसरात व्यावसायिक हात-पाय बांधलेल्या अवस्थेत आढळला होता.
औरंगाबाद : तापडिया कासलीवाल मैदानावर एका प्रदर्शनासाठी आलेल्या केटरिंग व्यावसायिकाचे अपहरण करून नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे नेल्यानंतर तेथे विष पाजून खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. १९ मे रोजी मध्यवर्ती बसस्थानक येथून हे अपहरण झाल्याने नाशिक जिल्ह्यातील वडनेर खाकुर्डी पोलिसांनी हा गुन्हा औरंगाबादेतील क्रांतीचौक पोलिसांकडे वर्ग केला.
अंशुमन नथू वाघ (४१, रा. मालेगाव कॅम्प, जि. नाशिक) असे मृताचे नाव आहे. अंशुमन हा केटरिंगचा व्यवसाय करायचा. तापडिया-कासलीवाल मैदानावर आयोजित प्रदर्शनात त्यांचे स्टॉल होते. हे प्रदर्शन १९ मे रोजी समाप्त झाले. २० मे रोजी सकाळी अंशुमन हा आंघोळ करण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानक येथे गेला. स्वच्छतागृहाजवळ आंघोळीचे कपडे ठेवून तो आंघोळ न करताच बाहेर पडला. दरम्यान २३ मे रोजी मालेगाव कॅम्प परिसरात तो हात-पाय बांधलेल्या अवस्थेत आढळला होता. पोलिसांनी अंशुमनला रुग्णालयात दाखल केले आणि दुसऱ्या दिवशी २४ मे रोजी त्यांचा जबाब नोंदविला, तेव्हा त्याने दोन अनोळखींनी एका वाहनातून त्याचे औरंगाबादेतील बसस्थानक येथून अपहरण केले. नंतर काही दिवस त्याला फिरविल्यानंतर त्यांनी हात-पाय बांधून विष पाजल्याचे म्हटले.
या जबाबानंतर दुसऱ्या दिवशी २५ मे रोजी अंशुमनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी (जि. नाशिक) पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदविला. अंशुमनचे अपहरण औरंगाबादेतून झाले असल्याने वडनेर खाकुर्डी पोलिसांनी हा गुन्हा तपासासाठी क्रांतीचौक ठाण्याकडे वर्ग केला. पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे. पोलीस निरीक्षक उत्तम मुळक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राठोड हे तपास करीत आहे.
सीसीटीव्हीची तपासणी
गुन्ह्याची माहिती मिळताच क्रांतीचौक पोलिसांनी तपास सुरू केला. तपास पथकाने मध्यवर्ती बसस्थानक येथील घटनेच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली. शिवाय मृत अंशुमन यांचा मोबाईल २० मे रोजी औरंगाबादेतील त्याच्या प्रदर्शनस्थळीच त्याने ठेवल्याचे स्पष्ट झाले.त्यांनी दिलेल्या जबाबात आरोपींची नावे सांगितली नाही. शिवाय अपहरणकर्त्यांनी वापरलेल्या वाहनाचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपींनी अंशुमनचे अपहरण आणि खून का केला, तसेच मारेकरी कोण आहेत, आदी प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहेत.