वंचित बहुजन आघाडीत माळी समाजाला हव्यात ५० जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 07:27 PM2019-09-05T19:27:59+5:302019-09-05T19:28:38+5:30
१५ सप्टेंबर रोजी अरणला सत्तासंपादन मेळावा
औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीकडून माळी समाजाला विधानसभेच्या ५० जागा हव्या आहेत. महाराराष्ट्रातत माळी समाजाची संख्या दोन कोटी आहे. आता ८० टक्के समाज वंचित बहुजन आघाडीकडे वळला आहे. नाशिक भागातला २० टक्के समाज छगन भुजबळ यांच्याकडे असू शकतो. सध्या माळी समाजाचे १२ आमदार आहेत; परंतु युती शासनात अलीकडेच फक्त एक मंत्री बनवण्यात आला आहे. एकूणच वंचितांना व माळी समाजाला वंचित बहुजन आघाडीकडूनच न्याय मिळू शकेल, असा विश्वास बुधवारी येथे सर्वशाखीय माळी समाज सत्तासंपादन महामेळाव्याचे प्रमुख संयोजक व वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केला.
अरण, जि. सोलापूर या संत सावता महाराजांच्या गावी हा महामेळावा १५ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यासंबंधीची सविस्तर माहिती लिंगे यांनी दिली.
अरण येथे सुमारे एक लाख माळी समाज बंधू-भगिनी जमतील. वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर हे मार्गदर्शन करतील. माळी समाजाला शासनकर्ती जमात बनविणे, जातनिहाय जनगणना करणे, सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरणला अ वर्ग दर्जा, पर्यटन क्षेत्राचा दर्जा, सावता महाराजांच्या नावाने वनौषधी संशोधन केंद्र स्थापन करणे, संविधान बचाव, आरक्षण संरक्षित करणे या मुद्यांवर महामेळाव्यात चर्चा होईल. पत्रपरिषदेस रामभाऊ पेरकर, गौतम क्षीरसागर, शिवाजी गाडेकर, बाबासाहेब पवार, हरिभाऊ पवार यांच्यासह माळी समाज बांधव उपस्थित होते.
लेना ना देना.... बीजेपी सेना...
पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी सांगितले की, सध्याचे सरकार वंचितांना न्याय देऊ शकत नाही. प्रश्न सोडवू शकत नाही. लेना ना देना... बीजेपी सेना अशी यांची अवस्था आहे. ६० टक्के ओबीसींना २७ टक्के आरक्षण आहे. त्यातही आता स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षणाच्या कपातीचा निर्णय शासनाने घेतला आहे. सेव्ह मेरिट... सेव्ह नेशनच्या आंदोलनाची दखल घेऊन ओबीसींना वैद्यकीय आरक्षण २ टक्केच देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. शेतकऱ्यांना हमी भाव नाही. त्यामुळे त्यांच्या आत्महत्या सुरू आहेत.