इंग्रजीच्या पेपरला केंद्र संचालकानेच पुरविल्या कॉप्या; ६ जण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 08:28 PM2020-02-19T20:28:02+5:302020-02-19T20:28:39+5:30
सामूहिक कॉपीचा हा प्रकार उघडकीस आल्यामुळे वाळूज परिसरात खळबळ उडाली आहे.
वाळूज महानगर : बारावी परीक्षेत रांजणगावातील गजानन कनिष्ठ महविद्यालय या परीक्षा केंद्रात कॉपी पुरविताना केंद्र संचालकासह ६ जणांविरुद्ध मंगळवारी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामूहिक कॉपीचा हा प्रकार उघडकीस आल्यामुळे वाळूज परिसरात खळबळ उडाली आहे.
इयत्ता बारावीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. रांजणगाव येथील श्री गजानन कनिष्ठ महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर ४१७ परीक्षार्थी असून, पहिल्या दिवशी इंग्रजी या विषयाचा पेपर होता. दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास या केंद्रातील प्रयोगशाळेच्या रूममध्ये काही शिक्षक बारावीच्या प्रश्नपत्रिकेतील उत्तरे शोधत असल्याचे पोलीस कर्मचारी विलास घनवटे व एसपीओ निमोने यांना दिसून आले. घनवटे यांनी पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांना या प्रकाराची माहिती दिली.
पोलीस निरीक्षक सावंत, उपनिरीक्षक प्रीती फड, पोहेकॉ. रामदास गाडेकर आदींच्या पथकाने या परीक्षा केंद्राची पाहणी केली असता त्यांना प्रयोगशाळेच्या रूममध्ये काही शिक्षक प्रश्नपत्रिकेतील उत्तरे शोधत असल्याचे दिसले. यानंतर पोलीस पथकाने या सर्व शिक्षकांना ताब्यात घेत शिक्षणाधिकारी बी.बी. चव्हाण यांना माहिती दिली. यानंतर उपशिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांनी या परीक्षा केंद्राची पाहणी केली. यात गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिकेवर शिक्षकांनी विविध प्रश्नांची उत्तरे लिहूून ठेवल्याचे आढळून आले.
परीक्षा केंद्रातील कोणा एका विद्यार्थ्याला कॉपी पुरविण्यासाठी संगनमत करून बारावी बोर्ड परीक्षेतील इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे उत्तर लिहिताना हे ६ शिक्षक आढळून आले आहेत. उपशिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र विद्यापीठ बोर्ड आणि इतर परीक्षांमध्ये होणाऱ्या व्यवहारांना प्रतिबंध अधिनियम १९८२ चे कलम ५ व ७ प्रमाणे एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रश्नपत्रिकेवर उत्तरे लिहिणारे हेच ते ६ जण
पोलिसांनी केंद्र संचालक रत्नमाला कदम (महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालय, वाळूज), प्रशांत गोरख मरकड (महाराष्ट्र पब्लिक स्कूल, वाळूज), शरणाप्पा साधू रसाळकर (शिक्षक, क्राईस्ट चर्च स्कूल, छावणी), कल्याण रघुनाथ कुलकर्णी (गजानन विद्यालय, रांजणगाव), लालेश हिराला महाजन (पी.एम. ज्ञानमंदिर, रांजणगाव) व अक्षय प्रकाश आरके (प्रयोगशाळा सहायक, महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालय, वाळूज) या ६ जणांना ताब्यात घेतले आहे.
छावणीतील नगरसेवक पुत्रास कॉपी देण्यासाठी प्रताप
वाळूज येथील महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयात छावणी नगर परिषदेच्या एका नगरसेवकाचा मुलगा बारावीचे शिक्षण घेत होता. या नगरसेवकाच्या मुलाकडे दिव्यांगाचे प्रमाणपत्र असून, त्याच्यासाठी केंद्रातील खालच्या खोलीमध्ये विशेष व्यवस्था केली होती. या नगरसेवकाने केंद्र संचालकाच्या मदतीने काही शिक्षकांना हाताशी धरून हा कॉपीचा प्रकार केल्याची चर्चा वाळूज महानगरात सुरू आहे.