लग्नासाठी घेतलेल्या पैशासाठी बेदम मारहाण, ज्योतीनगरमधील घटना
By राम शिनगारे | Published: October 15, 2023 08:36 PM2023-10-15T20:36:23+5:302023-10-15T20:36:51+5:30
उस्मानपुरा ठाण्यात सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : लग्नासाठी उधार घेतलेले २५ हजार रुपये दिले नाहीत, म्हणून एकास लोखंडी पाईप व लाकडी दांड्याने मारहाण केल्याची घटना १२ ऑक्टोबर रोजी घडली. या प्रकरणी सात जणांच्या विरोधात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नाेंदवला आहे.
संजय मानकरी (रा.ओझर ता. जिंतूर जि. परभणी, हल्ली मुक्काम भीमपुरा, उस्मानपुरा) यांनी मुलीच्या लग्नासाठी २०२१ मध्ये गजानन श्रीरंग मोरे यांच्याकडून एक लाख रुपये उधार घेतले होते. यापैकी ७५ हजार रुपये त्यांनी परत केले. २५ हजार रुपये शिल्लक होते. हे २५ हजार रुपये कधी देणार, यासाठी मोरेचा तगादा सुरू होता. ११ ऑक्टोबर रोजी गोरख बाजीराव वटाणे व गजानन मोरे यांनी त्यांना पैठणगेट येथे बोलावून घेतले. त्याठिकाणी पैसे कधी देणार अशी विचारणा करत शिवीगाळ केली.
मानकरी यांनी दोन दिवसांची मुदत मागितली. घरी गेल्यावर या घटनेबाबत त्यांनी पत्नी व इतर नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर त्यांची पत्नी, बहीण व मावशी यांनी १२ ऑक्टोबर रोजी २० हजार रुपये घेऊन गोरख वटाणे यांच्या ज्योतीनगर येथील नारायण अपार्टमेंट येथील निवासस्थानी गेले. त्यावेळी वटाणे यांनी मोरे यांना फोन करून घरी बोलावून घेतले. रेखा संजय मानकरी यांनी त्यांना २० हजार रुपये दिले व बाकीचे ५ हजार रुपये नंतर देते असे सांगितले.
यावर गजानन मोरे यांच्या पत्नीने आम्हाला सर्व पैसे आत्ताच पाहिजे, असे सुनावत त्यांना शिवीगाळ केली, तर आरोपी परमेश्वर समाधान मावई, राजेश समाधान मावई, गणेश समाधान मावई यांनीही त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्याचे लक्षात येताच घराबाहेर थांबलेले संजय मानकरी हे आत आले व त्यांना समजावून सांगू लागले, मात्र त्यांचे काहीही न ऐकता गोरख वाटाणे याने लोखंडी पाईपने त्यांच्या उजव्या पायावर मारून, तर गजानन मोरे यांनी लाकडाने पाठीवर मारून जखमी केले. यात मानकरी गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी मानकरी यांच्या तक्रारीवरून उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा नोंदवला.