पत्नीचा खून करून पती पोहोचला थेट पोलीस ठाण्यात; पोलिसांनी घेतले ताब्यात

By राम शिनगारे | Published: November 20, 2022 08:08 PM2022-11-20T20:08:55+5:302022-11-20T20:09:22+5:30

सततच्या कटकटीचा कंटाळून खून केल्याची कबुली आरोपीने दिली.

man killed his wife and reached to the police station; Police took him in custody | पत्नीचा खून करून पती पोहोचला थेट पोलीस ठाण्यात; पोलिसांनी घेतले ताब्यात

लाल वर्तुळात आरोपी.

googlenewsNext

औरंगाबाद: कौटुंबिक वादातून पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर आरोपी पतीने थेट चिकलठाणा पोलीस ठाणे गाठत गुन्ह्याची कबुली दिली. हा प्रकार रविवारी दुपारी २ वाजता आपतगाव येथे घडला. मृताच्या मुलाने आईला घाटी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केल्याची माहिती चिकलठाण्याचे सहायक निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी दिली.

सुनिता कडूबा हजारे (३८, रा. आपतगाव, ता. औरंगाबाद) असे मृत महिलेचे, तर आरोपी पतीचे कडूबा भागाजी हजारे (४२) असे नाव आहे. चिकलठाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; रविवारी दुपारी दोन वाजता कडूबा हजारे हा पोलीस ठाण्यात आला. त्याने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची माहिती दिली. त्यानुसार उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर, सपोनि. सुदाम शिरसाठ, उपनिरीक्षक बालाजी ढगारे, हवालदार दीपक देशमुख, रवी दाभाडे, बाबासाहेब मिसाळ यांच्या पथकाने आरोपीला सोबत घेऊन घटनास्थळ गाठले.

तेथे त्याने सर्व माहिती दिली. पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर तो थेट पोलीस ठाण्यात आला, तर त्याच्या मुलाने आईला सुरुवातीला खाजगी रुग्णालयात नेले होते. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासल्यानंतर घाटीत घेऊन जाण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार घाटीत डॉक्टरांनी तपासून सुनिता यांना मृत घोषित केले. चिकलठाणा पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांना तक्रार देण्यास सांगितले आहे, मात्र तक्रार देण्यास नातेवाईक समोर न आल्यास सरकारी पक्षातर्फे पोलीसच फिर्याद देऊन कडूबा हजारेच्या विरोधात गुन्हा नोंदविणार आहेत.

सासू, सासरे, मुलगा, सुनेला घराबाहेर काढले
मृत सुनिता यांना दोन मुले आहेत. त्यातील २४ वर्षे वयाच्या मुलाचे लग्न झालेले असून, त्याच्यासह सुनेचे सुनितासोबत पटत नव्हते. त्यामुळे तिने मुलासह सुनेला घराबाहेर काढले होते; तसेच आरोपी पतीच्या आई, वडिलांनाही घराबाहेर काढले होते. त्यातून पती कडूबासोबत सतत खटके उडत होते. या कौटुंबिक वादातून कडूबा याने पत्नीचा गळा आवळून खून केला. अनेक दिवसांपासूनचा वाद असल्यामुळे त्याने गुन्ह्याची कबुली देण्यासाठी थेट पोलीस ठाणे गाठले. सततच्या कटकटीचा कंटाळा आल्यामुळे एकदाचेच संपवून टाकल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले.

Web Title: man killed his wife and reached to the police station; Police took him in custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.