दुचाकीसमोर आलेल्या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात गमावला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 02:55 PM2020-11-07T14:55:22+5:302020-11-07T14:57:44+5:30
फुलंब्री बसस्थानकाजवळ दुचाकीसमोर अचानक कुत्रा आला.
फुलंब्री : दुचाकीसमोर अचानक आलेल्या कुत्र्याला वाचविण्याच्या नादात खाली पडलेल्या तरुणाला मागून येणाऱ्या ट्रकने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजेदरम्यान फुलंब्री येथील बसस्थानकाजवळ घडली. संतोष रावसाहेब भोपळे (२२) असे मयत तरुणाचे नाव आहे.
फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव कवाड येथील संतोष भोपळे हा चितेगाव येथील अजित सीड्स कंपनीत नोकरी करीत होता. गावाहून तो शुक्रवारी सकाळीच कंपनीत जाण्यासाठी निघाला होता. फुलंब्री बसस्थानकाजवळ आल्यानंतर त्याच्या दुचाकीसमोर अचानक कुत्रा आला. त्याला वाचविण्याच्या गडबडीत दुचाकीवरील नियंत्रण सुटून तो खाली पडला. तेवढ्यात मागून गॅसच्या टाक्या घेऊन औरंगाबादकडे जाणाऱ्या भरधाव ट्रक (एम.एच.- १८ बी.जी.- १५९९) ने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर ट्रकचालक स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला. या घटनेची माहिती मिळताच फुलंब्री पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संतोषला रुग्णालयात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावरच कुटुंबावर आघात
संतोषचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर ऐन दिवाळीच्या तोंडावरच भोपळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. संतोषच्या पश्चात आई वडील, पत्नी व एक आठ महिन्याचा मुलगा आहे. संतोषचे वडील रावसाहेब भोपळे हे कीर्तनकार असल्याने पंचक्रोशीतून या घटनेबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.