पैशाच्या वादातून एकाचा विहिरीत ढकलून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 06:34 PM2019-04-22T18:34:59+5:302019-04-22T18:35:49+5:30
जालना जिल्ह्यातील मौजपुरी परिसरात आढळला मृतदेह
औरंगाबाद : ९ एप्रिलपासून बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीचा पैशाच्या वादातून विहिरीत ढकलून खून केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी मृताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
विजय देवीदास सुर्वे (४१, रा. शंभूनगर) असे मृताचे नाव आहे. त्यांची पत्नी पुष्पा या औरंगाबादमधील एका खाजगी रुग्णालयात परिचारिका आहेत. त्यांना मुलगा आणि मुलगी आहे. ९ एप्रिल रोजी पुष्पा सुर्वे या कामावरून घरी आल्या असता मनोज शहादेव गवळी (रा. इंदिरानगर) आणि विजय सुर्वे यांच्यात वाद सुरू होता. गवळी हा विजय यांना सोबत चल म्हणून हट्ट करीत होता. त्यानंतर विजय सुर्वे पत्नीची दुचाकी (एमएच-२० डीवाय-५७९४) घेऊन निघून गेले. तेव्हापासून ते बेपत्ता होते.
याबाबत त्यांच्या पत्नीने जवाहरनगर पोलीस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. १२ एप्रिल रोजी मनोज गवळी दोन वेळा सुर्वे यांच्या घरी गेला. त्याने विजय सुर्वेबाबत पुष्पाकडे विचारणा केली. तसेच सावरगाव (जि. जालना) येथे चला तीन तासांत विजय कुठे आहे ते दाखवतो, असेही मनोज गवळीने त्यांना सांगितले. त्यामुळे मनोज गवळीवर सुर्वे कुटुंबियांचा संशय बळावला होता. याच दरम्यान मौजपुरी ठाण्यातून पुष्पा सुर्वे यांच्या भावाला पोलिसांचा फोन आला. त्यांनी खात्री केल्यानंतर विहिरीतील मृतदेह विजय सुर्वे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी मनोज गवळीविरुद्ध जालना जिल्ह्यातील मौजपुरी ठाण्यात गुन्हा नोंद केल्यानंतर तो जवाहरनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.