हातपाय बांधून रेल्वेरुळावर टाकलेल्या 'त्या' युवकाचा पाच मिनीटावर होता मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 07:16 PM2017-11-16T19:16:41+5:302017-11-16T19:20:44+5:30
औरंगाबाद: उसणे पैसे परत मागवून एका २९ वर्षीय युवकाला जोरदार मारहाण करीत विष पाजून रेल्वेपटरीवर फेकून दिले. परंतु, काही ...
औरंगाबाद: उसणे पैसे परत मागवून एका २९ वर्षीय युवकाला जोरदार मारहाण करीत विष पाजून रेल्वेपटरीवर फेकून दिले. परंतु, काही दक्ष नागरिक व पोलिसांच्या सर्तकतेने या युवकाला तेथून बाजूला घेण्यात आले. याच वेळी रूळावरून पाच मिनीटाच्या अंतराने दोन रेल्वे धडधडत गेल्या. हि थरारक घटना बुधवारी रात्री घडली मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनवर घडली.
रविंद्र नाना दांडगे (२८, रा. चेतनानगर हर्सुल) असे त्या युवकाचे नाव असून त्याच्यावर घाटीच्या वॉर्ड क्रमांक ८ मध्ये उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, भोकरदन येथील काकोबा तळणीचा गोपाल प्रकाश भुतेकर याने मुकुंदवाडी रेल्वे स्थानकाजवळून फोन करुन रविंद्रला बोलवून घेतले. त्यावेळी भुतेकर व रवींद्र यांच्यात उधारीचे पैसे कधी देणार यावरून शाब्दीक वाद सुरु झाला. यावर रविंद्रने त्याला जानेवारीत पैसे देतो असे सांगीतले. परंतु; भुतेकर याने त्याच्या पोटात पाठीवर लाथाबुक्याने जोरदार मारहाण केली. यानंतर त्याचे हातपाय बांधून विषाची बॉटल तोंडात टाकली व त्याला विश्रांतीनगर परिसरातील रेल्वेपटरीलगत नेऊन टाकले.
अन् रिक्षाचालक धावले मदतीला...
रात्र झाल्याने रूळावर देखील काळोख होता, पायी जाणा-या एका युवकाला पटरीच्या बाजूला काही हालचाल दिसली. त्याने पुन्हा निरखुन पाहिले असता एक व्यक्ती अत्यवस्थेत पडलेला दिसून आला. त्याने आरडाओरड केल्याने काही रिक्षाचालक व नागरिकांनी रूळाकडे धाव घेतली. याचवेळी घटनेची माहिती पुंडलीकनगर पोलिसांना दिल्याने तेही घटनास्थळी धावून आले.
गुरूवारी झाला गुन्हा दाखल
प्रकृती अत्यवस्थ असल्याने नागरिकांनी रवींद्रला उपचारासाठी तात्काळ शासकीय दवाखान्यात दाखल केले. तोपर्यंत त्याच्या नातेवाईकांनी देखील घाटीत गर्दी केली होती. यावेळी त्याची प्रकृती स्थिर नसल्याने पोलिसांना पूर्ण चौकशी करता आली नाही. यामुळे आज पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात जिवेमारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक मुदीराज करीत आहेत.